एप्रिल संपत आला, मे आणखी ताप देणार! भारतात दुष्काळाचा अंदाज, मान्सूनवरही परिणाम होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:54 PM2023-04-25T19:54:06+5:302023-04-25T20:18:52+5:30
देशातील ७० टक्के शेती ही मान्सूनवर केली जाते. या पावसावर सर्व शेतकरी अवलंबून असतात.
दक्षिण आणि पूर्व आशियाई देशांसह भारतात यंदा उष्णतेने कहर मांडला आहे. जर असेच तापमान राहिले तर दुष्काळाचा देखील सामना करावा लागू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक हवामान विज्ञान संघटनेने (WMO) ने या तापमान वाढीला अल नीनो जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यामुळे भारतासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
उन्हाळा आलाय, ही काळजी घ्या, हे खा... पाणी पाणी करणार नाही...
अल नीनोमुळे तापमान वाढल्याने त्याचा परिणाम पावसावरही होणार आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यावर याचा मोठा परिणाम जाणवेल असे या संस्थेने म्हटले आहे. जागतिक हवामान विज्ञान संघटनेनुसार मे महिन्यात अल नीनोचा परिणाम दिसू लागणार आहे. याचा परिणाम मान्सूनवरही दिसेल. देशातील ७० टक्के शेती ही मान्सूनवर केली जाते. या पावसावर सर्व शेतकरी अवलंबून असतात.
काही दिवसांपूर्वी केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनीही भारतातील उष्णतेवर आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये भारताचा ९० टक्के भाग हा उष्णतेच्या धोकादायक झोनमध्ये असल्याचे म्हटले होते. हा अहवाल PLOS Climate मध्ये प्रकाशित झाला होता.
उष्माघातापासून कसे वाचवाल स्वत:ला, हे आहेत संकेत, लक्षणे...
या अहवालानुसार मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा उष्णतेच्या लाटेमध्ये समावेश आहे. या भागात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे. वाढत्या उष्णतेला रोखण्यासाठी भारतासह संपूर्ण जगाने एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे या अहवालात म्हटले आहे.
हवामान विभाग काय सांगतो...
पुढील 7 दिवसात भारताच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट नसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 25 ते 27 एप्रिल दरम्यान ओडिशात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 25-26 एप्रिल रोजी विदर्भ, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी तर 25 ते 27 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.
उन्हात तापलेली कार आतून लगेचच कशी थंड कराल? एसी वाढवण्याची चूक सारेच करतात...