‘एप्रिल हीट’ने होरपळ
By admin | Published: April 16, 2016 04:24 AM2016-04-16T04:24:01+5:302016-04-16T04:24:01+5:30
देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट पसरली असून, ‘एप्रिल हीट’ने जनजीवन होरपळले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशात आतापर्यंत सुमारे १५0 लोक मृत्युमुखी पडले आहेत.
नवी दिल्ली : देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट पसरली असून, ‘एप्रिल हीट’ने जनजीवन होरपळले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशात आतापर्यंत सुमारे १५0 लोक मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट असून, या दोन्ही ठिकाणी अनेक जण उष्माघाताने आजारी पडत आहेत. ही लाट पुढील पाच दिवस कायम राहील, असा अंदाज आहे. वर्धा व अकोल्यात पारा ४५ अंशावर पोहाचला आहे.
तामिळनाडू, पुडुच्चेरी आणि मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट असून, पुडुच्चेरी व तामिळनाडूतील अनेक शहरांतील तापमान ४१ अंशावर तर मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये तापमान ४२ च्या वर गेले आहे. आंध्र, तेलंगणा व ओडिशामध्ये शाळांना २१ एप्रिलपर्यंत सुटी देण्यात आली असून, तेलंगणा व कर्नाटकच्या काही भागांत कार्यालयाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. यंदाचा एप्रिल महिना गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक उष्ण राहील. राजधानी दिल्लीत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर गेले. तेलंगणा, आंध्र प्रदेश, मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटकातील विविध भागांसह भारतीय उपखंडात सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे.