ए.आर. रहमान यांच्याविरुद्ध फतवा
By admin | Published: September 13, 2015 01:58 AM2015-09-13T01:58:57+5:302015-09-13T01:58:57+5:30
‘मोहंमद-मेसेंजर आॅफ गॉड’ हा चित्रपट इस्लाम आणि प्रेषित मोहंमद यांचा अपमान करणारा असल्याचा दावा करून रझा अकादमीने या चित्रपटाचे निर्माते मजीद माजिदी
नवी दिल्ली : ‘मोहंमद-मेसेंजर आॅफ गॉड’ हा चित्रपट इस्लाम आणि प्रेषित मोहंमद यांचा अपमान करणारा असल्याचा दावा करून रझा अकादमीने या चित्रपटाचे निर्माते मजीद माजिदी आणि सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांच्याविरुद्ध फतवा काढला आहे.
बहुसंख्य शिया लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रकाशित झाला. मुंबईतील रझा अकादमी ही सुन्नी मुस्लिमांची संघटना आहे. इस्लाममध्ये प्रेषित मोहम्मद यांचे चित्र रेखाटणे अथवा त्यांची व्यक्तिरेखा साकारणे निषिद्ध मानले जात असताना ‘मोहंमद-मेसेंजर आॅफ गॉड’मध्ये या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा दावा अकादमीने केला आहे. अकादमीचे प्रमुख सईद नूरी यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाच्या नावासच मुळात आमचा आक्षेप आहे. लोकांना चित्रपट आवडला नाही तर ते या नावाचा वाईट पद्धतीने उल्लेख करतील. ज्याने इस्लामचा व प्रेषितांचा अपमान होईल.
चित्रपटात भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांचे चारित्र्य आक्षेपार्हही असू शकेल. प्रेक्षकांच्या मनात साहजिकच याची सांगड प्रेषितांशी घातली जाईल. हे मुस्लिमांना कदापि मान्य होणार नाही. अकादमीने याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ न देण्याची मागणीही केली आहे.
माजिदी आणि रेहमान यांनी इस्लामविरोधी काम केले असल्याने त्यांच्याविरुद्ध हाजी अली मशिदीचे इमाम मुफ्ती मेहमूद अख्तर यांनी हा फतवा काढला आहे. या दोघांनी पुन्हा कलमा म्हणून आपले इमान बळकट करावे असे मौलानांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे त्यांचे लग्न झाले असल्यास त्यांना पुन्हा त्यांच्या पत्नीशी लग्न करावे लागेल, असे या फतव्यात नमूद आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)