पारनेरमधील अनधिकृत फलकांना चाप, दर लागू होणार
By Admin | Published: January 8, 2016 11:19 PM2016-01-08T23:19:18+5:302016-01-09T12:25:23+5:30
पारनेर नगरपंचायत मासिक सभेत निर्णय : पाणीपी वाढीचाही निर्णय
पारनेर नगरपंचायत मासिक सभेत निर्णय : पाणीपट्टी वाढीचाही निर्णय
पारनेर : नगरपंचायतीच्या निकषाप्रमाणे पारनेर शहरातील पाणीपट्टी वाढविण्याचा तसेच पारनेरमधील अनधिकृत फलकांवर कारवाई करतानाच त्यांच्यासाठीही आता दर लागू करण्याचा निर्णय पारनेर नगरपंचायतीच्या पहिल्याच मासिकबैठकीत घेण्यात आला. यातील घरपट्टीवाढीचा निर्णय मात्र लांबणीवर पडला आहे.
पारनेर नगरपंचायतीची पहिली मासिक सभा गुरूवारी नगराध्यक्षा सीमा औटी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून त्यात व पाणीपट्टी वसुलीत मेळ बसत नसल्याने पाणीपट्टीत वाढ करावी लागणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले. सध्या दुष्काळी परिस्थिती असून पाणीपट्टी किमान वर्षभर वाढवू नये, असे मत नगरसेविका शशिकला शेरकर यांनी मांडले. त्यांच्या या मुद्याला विजेता सोबले, संगीता औटी, वर्षा नगरे, मालन शिंदे यांनीही साथ देत पाणीपट्टी वाढीला विरोध दर्शविला. मात्र पाणीपुरवठाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सत्ताधार्यांनी सांगितले व वाढीला मंजुरी दिली.
हंगा तलावाजवळून पारनेर शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तेथे काही विकास कामे करायची आहेत, असा प्रस्ताव पाणीपुरवठा समितीचे सभापती नंदकुमार देशमुख यांनी मांडला. त्यास मंजुरी देण्यात आली. उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र येणे गरजेचे असून सर्व नगरसेवकांनी नगरपंचायतीत येऊन विकासकामांकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत नोंदविले.
पारनेर शहरात फ्लेक्सवर कर लावण्यात येणार असून त्यामुळे अनधिकृत फलकांना चाप बसेल व उत्पन्न वाढेल, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, बांधकाम सभापती किसन गंधाडे, पाणीपुरवठा समितीचे सभापती नंदकुमार देशमुख, सार्वजनिक आरोग्य सभापती डॉ.मुदस्सर सय्यद, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा भालेकर व मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक चंद्रकांत चेडे, विशाल शिंदे, नंदकुमार औटी, दत्ता कुलट, वैशाली औटी, नंदा देशमाने, गणपत अंबुले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)