लोकांनी टोमणे मारले पण 'ती' खचली नाही; 4 मुलांची आई झाली बिहारची पहिली महिला कॅब ड्रायव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:01 AM2023-05-04T11:01:38+5:302023-05-04T11:02:14+5:30
अर्चना यांना बेरोजगारीचा सामना करावा लागला, पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि स्वावलंबी झाल्या.
पाटणा येथील अनिशाबाद येथील रहिवासी असलेल्या अर्चना पांडे या बिहारच्या पहिल्या महिला कॅब चालक आहेत. अर्चना कॅब चालवून तीन मुली आणि एका मुलाचा सांभाळ करतात. स्वत: काम करून अर्चना यांनी आपल्या चार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. अर्चना यांच्या या निर्णयाचे आता लोक कौतुक करत आहेत आणि जिद्दीला देखील सलाम करतात.
अर्चना यांना बेरोजगारीचा सामना करावा लागला, पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि स्वावलंबी झाल्या. अर्चना गेल्या दोन वर्षांपासून कॅब चालवतात. बिहारमधून कॅब घेऊन सात वेगवेगळ्या राज्यात त्या गेल्या आहे. अर्चना यांनी आज तकशी संवाद साधताना सांगितले की, समजातील काही लोकांनी सुरुवातीला खूप टोमणे मारले पण आता त्या टोमण्यांची पर्वा करत नाहीत.
बिहारच्या पहिल्या महिला कॅब ड्रायव्हर अर्चना म्हणतात की चार मुलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. त्यांनी आधी खासगी नोकरी केली, नंतर स्वतःचा व्यवसाय केला, पण काही कारणास्तव यश मिळू शकले नाही. त्यानंतर समाजाच्या टोमण्यांची पर्वा न करता कर्ज काढून मारुती 800 गाडी घेतली आणि त्या कॅब ड्रायव्हर झाल्या.
अर्चना सांगतात की, "या कामानंतर अनेक लोक त्यांची टिंगल करतात आणि काही लोक कौतुकही करतात. माझे कौतुक करणार्यांचे आभार, पण जे बोलत राहतात त्यांची मी दखल घेत नाही. लोकांचं बोलणं हे काम आहे."
अर्चना पांडे म्हणतात की, त्यांनी स्वत:ला स्वावलंबी बनवले आहे, पण बिहारमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना स्वावलंबी व्हायचे आहे. त्या महिलांना प्रशिक्षण घ्यायचे असेल तर मी त्यांना प्रशिक्षण देईन. भविष्यात मी कर्जावर आणखी वाहने घेईन, त्यानंतर या क्षेत्रात अधिकाधिक महिलांना रोजगार देईन. जास्तीत जास्त महिलांना रोजगार देण्याचे माझे स्वप्न आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"