Hathras gangrape : 'हाथरसमधील 'त्या' मुलीवर बलात्कार करणारे नटीबाईचे भाईबंद आहेत का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 08:51 AM2020-10-05T08:51:40+5:302020-10-05T08:52:49+5:30
Hathras gangrape : हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे.
मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरुन देशात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र आता या घटनेवरुन राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. हाथरसमध्ये एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणात ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या घटनेची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने एसआयटी नेमली होती, त्याचसोबत याचा तपास सीबीआयने करावा अशी शिफारसही उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. मात्र, याप्रकरणावर ब्र शब्दही न काढणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत आणि बिहारच्या माजी पोलीस महासंचलाकांवर शिवसेनेनं टोकाचे बाण चालवले आहेत.
हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना-कंगना वादानंतर प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडणारी कंगना याप्रकरणावर गप्प का? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात येत आहे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये! असे म्हणत शिवसेनेनं बिहार सरकारसह माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
एम्सच्या अहवालातून सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे, 'सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह 'एम्स'चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. 'एम्स'ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय?' असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून विचारलाय. तसेच, सुशांतप्रकरणावरुन महाराष्ट्राची बदनामी करु पाहणारे, हाथरस प्रकरणावर गप्प का आहेत? असेही शिवसेनेनं म्हटलंय.
कंगनावर निशाणा
सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? , असा सवाल शिवसेनेच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय.
गुप्तेश्वर कोणते प्रायश्चित घेणार ?
सुशांतप्रकरणात मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि 'एम्स'च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला. रिया चक्रवर्तीने सुशांतला विष देऊन मारले हा 'बनाव'सुद्धा चालला नाही, पण सुशांत 'ड्रग्ज' घेत होता व त्याला ते मिळवून दिले म्हणून अखेर त्या रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकले. सुशांतवर मृत्यूनंतर हाच खटला चालवण्याची कायदेशीर व्यवस्था असती तर 'ड्रग्ज' प्रकरणात सुशांतवर अमली पदार्थ सेवनाचा खटला चालला असता. मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि 'गुप्तेश्वर' आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!
योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर
हाथरसमधील मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येनंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले होते. विरोधी पक्षांशिवाय भाजपामधील नेत्यांनीही पीडितेचा मृतदेह जाळल्याच्या प्रकरणाबाबत योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी शनिवारीही पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी हाथरस येथे पोहोचले, तेव्हा मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केली होती. काँग्रेसशिवाय समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षानेही योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.