व्हॉट्सअॅपवरील मेसेजेस खरेच ‘प्रायव्हेट’ असतात का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 01:46 AM2020-09-28T01:46:36+5:302020-09-28T01:47:03+5:30
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणजे काय?
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाने आणखी एक मुद्दा चव्हाट्यावर आणला आहे, तो म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेजेसच्या सुरक्षेचा. ते खरंच सुरक्षित असतात? वापरकर्त्याच्या संमतीविना कोणीच पाहू शकत नाही, अशी खात्री ही कंपनी देते, ते बरोबर आहे का? मग हे खासगी मेसेजेस तिसऱ्या व्यक्तीकडे कसे जातात?
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणजे काय?
फेसबुक म्हणते, दोन व्यक्तींमध्ये व्हॉट्सअॅपवर झालेले संभाषण तिसºया व्यक्तीला पाहता येत नाही. अगदी व्हॉट्सअॅप कंपनीलाही नाही. त्यालाच एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणतात.
मग एनसीबीकडे व्हॉट्सअॅप चॅट आले कसे?
सर्वसाधारणपणे आपण व्हॉट्सअॅपचे बॅकअप घेत असतो. त्यासाठी कधी मोबाइलवरील मेमरीचा, गुगल ड्राइव्हचा किंवा आयक्लाउडचा वापर करत असतो. त्यामुळे जेव्हा आपण संवाद साधत असतो ते आॅटो बॅकअप फिचरमुळे सेव्ह होत जातात. आपण मोबाइल बदलला तर आधीचे मेसेजेस मिळवण्यासाठी आपल्याला हे बॅकअप फायद्याचे ठरते. हेच एनसीबीसाठी फायद्याचे ठरले.
तपास सुरू झाला तेव्हा एनसीबीने मोबाइलचे क्लोनिंग केले. त्यामुळे सगळा व्हॉट्सअॅप बॅकअप तपास संस्थेच्या हाती आला. पुढे जे घडले ते सर्वांनाच माहीत आहे.
आपल्या मेसेजेसच्या सुरक्षेचे काय?
यासाठी एक सुविधा व्हॉट्सअॅपवर दिली जाते. त्या फिचरला टू फॅक्टर आयडेंटिफेकशन असे म्हणतात. हा सहा डिजिटचा एक कोड असतो. त्यामुळे तिसºया व्यक्तीला तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये फेरफार करण्यापासून रोखता येते. जर एखादी तपास संस्था किंवा हॅकर तुमच्या मोबाइलचे क्लोनिंग करणार असेल तर त्यांना व्हॉट्सअॅप अकाउंट क्लोन करण्यासाठी या नंबरची गरज लागले. जो फक्त तुमच्याकडे असेल !