फक्त पाकिस्तान कुठे गोळीबार करतो, आपणही करतोच की!; अब्दुल्लांची मुक्ताफळं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 01:48 PM2018-02-06T13:48:42+5:302018-02-06T13:49:15+5:30
गेल्या पाच आठवड्यात पाकिस्तानने 500 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
नवी दिल्ली: सीमारेषेवर एकट्या पाकिस्तानकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन होते असे नाही. भारताच्या बाजूनेही अनेकदा गोळीबार केला जातो, असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. भारत- पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला असतानाच फारुख अब्दुल्ला यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटले की, सीमारेषेवर फक्त पाकिस्तानकडूनच गोळीबार केला जातो का? आपणही त्यांच्यावर गोळीबार करतोच की. त्यामुळे अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे भविष्यात युद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. परंतु, युद्धामुळे ही समस्या सुटणार नाही. हा प्रश्न फक्त चर्चेनेच सुटू शकतो, असे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले.
फारुख अब्दुल्ला यांनी भारत- पाकसंबंधावर वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये फारुख अब्दुल्लांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून पीओकेला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे विधान केले होते.
पाकिस्तानने बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सैन्यांना भारतीय बीएसएफ जवान, लष्कर यांच्यासोबत स्थानिकांनाही टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत. फक्त गेल्या पाच आठवड्यात पाकिस्तानने 500 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यावर्षी फक्त एकट्या जम्मूमध्ये 200 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. यामधील सर्वात जास्त शस्त्रसंधी उल्लंघन सर्जिकल स्ट्राईकनंतर करण्यात आले आहे. 2015 मध्ये पाकिस्तानने एकूण 405 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केले होते