Sharad Pawar: आपण राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहात का? शरद पवारांनीच दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 11:48 AM2022-06-14T11:48:36+5:302022-06-14T11:49:38+5:30
शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
मुंबई - देशात राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील (UPA) बऱ्याच पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनीदेखील पवार राष्ट्रपती झाल्यास तो महाराष्ट्राचा सन्मान असेल, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे, युपीएकडून शरद पवार यांचे नाव चर्चेत असताना आता खुद्द शरद पवारांनीच याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. तर, शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच होईल, ही महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब असेल असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच, देशातील राजकीय वर्तुळातही पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, मी या स्पर्धेत नसल्याचं खुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. दरम्यान शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता, आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं. त्यामुळे, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
शरद पवारांनी राष्ट्रपती होऊ नये - आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळंच गणित मांडलं. शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये, असं म्हणत त्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं. शरद पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व स्वत:ला राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात कोंडून घेऊ शकत नाहीत. जे राजकारणी मुख्यप्रवाहात असतात, त्यांनी मुख्यप्रवाहातच राहावं. ज्या पद्धतीने शरद पवार आजही ग्रामीण भागात फिरतात, लोकांशी संवाद साधतात ते पाहता त्यांनी याचपद्धतीचे काम कायम करावे असं मला वाटतं. ते राष्ट्रपती झाले तर त्यामुळे महाराष्ट्राचा सन्मान होईल हे खरं आहे. पण शरद पवार जोपर्यंत लोकांच्यात मिसळत नाहीत तोवर त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि आनंद दिसत नाही. त्यामुळे त्यांनी लोकांमध्येच राहावे, तोच त्यांचा खरा हक्क आहे", असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.