खरंच तुम्ही जागरूक पालक आहात? मुलांची योग्य काळजी घेता?
By admin | Published: June 14, 2017 06:02 PM2017-06-14T18:02:06+5:302017-06-14T18:02:06+5:30
जागतिक अभ्यास सांगतो, भारतीय पालक मुलांची नीट काळजी घेत नाहीत.. - जरा पाहा तपासून स्वत:ला.
- मयूर पठाडे
अनेक पालकांची तक्रार असते.. विशेषत: हे मूल जर तीन वर्षांच्या आतील असेल तर.. ‘आम्ही मुलाकडे इतकं लक्ष देतो, त्याला हवं ते खायला घालतो.. जेवणाची वेळही त्याची एकदाही चुकवत नाही.. तो भुकेला राहणार नाही याची काळजी घेतो.. पण तरीही आमचं मूल अॅक्टिव्ह नाही. त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत त्याची वाढ कमी आहे असं वाटतं, त्याच्या हालचाली तुलनेनं मंद वाटतात..’
- तुमचीही अशीच तक्रार आहे? तुमचंही मूल अगदी अस्संच आहे, असं तुम्हाला वाटतं?
तर मग नक्कीच समजा, त्याला मायक्रोन्युट्रिअंट डेफिशिअन्सी आहे. आणि ही काही फक्त तुमचीच समस्या नाही, भारतीय घराघरांत हेच चित्र आहे. युनिसेफनंही नुकतंच त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. भारतीय पालक आपल्या मुलांची नीट काळजी घेत नाहीत, असाच त्याचा मतितार्थ आहे.
आपण काय करतो? आपलं मूल चांगलं गोबरं, गुबगुबित दिसावं यासाठी त्याला अगदी दे मार, चारी ठाव खाऊ घालत असतो. पण त्यात बऱ्याचदा फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सचाच समावेश असतो. मात्र यासोबतच ज्या सूक्ष्म घटकांची शरीराला आवश्यकता असते, त्याकडे मात्र बऱ्याच मातांचं आणि पालकांचं दुर्लक्षच होतं.
कोणते आहेत हे घटक?
लोह, झिंक, आयोडिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, फोलेट.. इत्यादि अनेक मायक्रोन्युट्रिअंटची आपल्या मुलांच्या शरीरात कमतरताच असते आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना नंतरच्या आयुष्यात भोगावे लागतात.
मायक्रोन्युट्रिअंटच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे दोष
‘लॅन्सेट‘ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्येही यासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल सांगतो, मुलांच्या वाढीत या मायक्रोन्युट्रिअंट्सचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. विशेषत: पहिल्या हजार दिवसांत, म्हणजेच साधारण तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या वाढीत त्यांची भूमिका अनन्यसाधारण असते. या काळात जर मुलांना व्यवस्थित पोषक द्रव्ये मिळाली, तरच त्यांची वाढ योग्यरित्या होईल. ती खऱ्या अर्थानं ‘गुटगुटित‘ आणि हेल्दी असतील.
- तुमचंही मूल तुम्हाला खरोखरच अशा पद्धतीनं गुटगुटित हवं असेल, तर या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल.