सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:34 IST2025-02-20T17:33:26+5:302025-02-20T17:34:22+5:30
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी देशभरातील एनडीएशासित राज्यांच्या नेत्यांनी हजेरी लावील.

सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न...
Pm Naredra Modi Pawan Kalyan : दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी गुरुवारी(दि.20) दिल्लीच्या रामलीला मैदानात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी एनडीएशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेते आले होते. यावेळी पीएम मोदींनी सर्व नेत्यांशी आपुलकीने चर्चा केली. पण, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासोबत झालेल्या संवादामुळे एकच हशा पिकला.
Special conversation between Modi and Pawan Kalyan pic.twitter.com/KN1MFCN1MB
— Naren (@Narenaushyd) February 20, 2025
शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना पवन कल्याण यांनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या संवादाची माहिती दिली. मीडियाने पवन कल्याणला विचारले की, पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा झाली, त्यावर ते म्हणाले, "पंतप्रधान नेहमी माझ्याशी विनोदशैलीत बोलतात. आजही त्यांनी माझा पोशाख पाहून विचारले की, मी सर्व काही सोडून हिमालयात जात आहे का?" यावर पवन कल्याण यांनी उत्तर दिले, "अजून बरेच काम बाकी आहे. हिमालय थांबू शकतो."
पवन कल्याण यांच्या पोशाखाची चर्चा
पवन कल्याण खूप धार्मिक आणि कट्टर हिंदुत्ववादी आहेत. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून ते बऱ्याचदा भगव्या रंगाचे साधे सुती कपडे घातलेले पाहायला मिळतात. अलीकडेच त्यांनी दक्षिण भारतातील विविध मंदिरांना भेटी दिल्या आणि महाकुंभालाही जाऊन संगमात पवित्र स्नान केले.
दिल्लीला मिळाला नवा मुख्यमंत्री
रेखा गुप्ता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. रेखा गुप्ता यांच्यासोबत प्रवेश वर्मा, आशिष सूद, पंकज सिंग, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा आणि रवींद्र इंद्रराज यांनीही शपथ घेतली.