करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:36 PM2024-10-21T15:36:50+5:302024-10-21T15:46:18+5:30
Rajasthan News: करवा चौथच्या सणासाठी पती घरात उशिरा आल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण होऊन संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची तर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या पतीनंही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली.
करवा चौथच्या सणासाठी पती घरात उशिरा आल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण होऊन संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची तर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या पतीनंही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली. दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी सदर तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता, अशी माहिती समोर येत आहे.
ही घटना राजस्थानमधील हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल सिरस गावात घडली आहे. येथील घनश्याम बुनकर हे घरी उशिरा पोहोचल्याने त्यांची पत्नी मोनिका ही नाराज झाली. त्यानंतर या दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर मोनिका ही रागाने घराबाहेर पडली. तिच्यापाठोपाठ घनश्यामही तिची समजूत काढण्यासाठी गेला. मात्र मोनिका हिने रेल्वे रुळांवर जात भरधाव येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारली आणि जीवन संपवलं.
तुकडे तुकडे झालेला मोनिका हिचा मृतदेह पाहून घनश्यामला मोठा धक्का बसला. त्याने घरी येत काही तासांनंतर मोहिका हिच्या साडीपासून गळफास बनवला आणि जीवन संपवलं. पती आणि पत्नीने उचललेल्या टोकाच्या पावलाची माहिती मिळताच पोलिसांनी घनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि रुग्णालयातील शवागारामध्ये पाठवले.
दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी मृत घनश्याम याने भावाला एक मेसेज केला होता. त्यात तो म्हणाला होता की, ‘’भावा, मी हरलो! सॉरी, गणपतजी आणि घनश्याम कंडेल यांच्याशी बोलून घे. ते तुम्हाला मदत करतील. माझ्या आयडीवर आता तुम्हालाच काम करायचं आहे. माझ्या पत्नीनं आज ट्रेनसमोर येऊन जीवन संपवलं’’. दरम्यान, घनश्याम याचा हा मेसेज मोठ्या भावापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने आपलं जीवन संपवलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घनश्याम नेटवर्क मार्केटिंग कंपनीमघ्ये काम करत होता. तसेच करवा चौथच्या दिवशी उशिरा घरी पोहोचला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यातून दोघांनीही जीवन संपवलं.