लेंग्यावरून वाद, मग स्टेजवर बदलली नवरी, लग्नमंडपात नवरदेवाचा थयथयाट, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 02:51 PM2024-07-16T14:51:03+5:302024-07-16T14:51:43+5:30
Marriage News: लग्न लागून वरमाळ घालण्याची वेळ आली असतानाच नवरदेवाने वधूशी विवाह करण्यास नकार दिला. वधू बदलल्याचा दावा करत नवरदेवाने मंडपात गोंधळ घातला. अखेरीस हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यानंतर...
हल्ली कुठल्या ना कुठल्या कारणावरून लग्न समारंभात वादविवाद होण्याच्या अनेक घटना घडना घडत असतात. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे शुक्रवारी रात्री एका लग्नसोहळ्यात असाच प्रकार घडला. येथे लग्न लागून वरमाळ घालण्याची वेळ आली असतानाच नवरदेवाने वधूशी विवाह करण्यास नकार दिला. वधू बदलल्याचा दावा करत नवरदेवाने मंडपात गोंधळ घातला. अखेरीस हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गायघाट येथून वरातीसह नवरदेव वाजत गाजत धूमनगर येथे पोहोचला होता. वऱ्हाड्यांचं प्रथेप्रमाणे स्वागत झालं. मात्र लग्न लागत असताना ऐनवेळी नववधूला पाहून नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. नवरीच्या गळ्यात माळ घालण्याची वेळ आली असताच वराने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, नवरीचे कुटुंबीय शांत होते. तर नवरदेव वधू बदलण्यात आल्याचा आरोप करत होता. लग्नाचे विधी पार पाडण्यासाठी वधूच्या वेशात तिची बहीण पोहोचली होती. त्यामुळे नेमकं झालं काय, हे उपस्थित पाहुणे मंडळी आणि वऱ्हाड्यांना समजत नव्हतं. ऐनवेळी नवरी कशी काय बदलू शकते, असा प्रश्न त्यांना पडला होता. वाद वाढत असताना वरपक्षाने पोलिसांनाही बोलावून घेतले.
मुझफ्फरपूर येथील गायघाट येथे राहणाऱ्या टुनटुन कुमार याचा विवाह धूमनगर येथील सपना कुमारी हिच्यासोबत ठरला होता. वरातीसह वाजतगाजत नवरदेव विवाहस्थळी आला. मात्र त्याचवेळी वधू सपना हिला लेंगा न आवडल्याने तिने लग्नास उभी राहण्यास नकार दिला. सपना हिला तिच्या आई वडिलांनी खूप समजावले. मात्र ती लग्नासाठी तयार होईना. तिने लग्न करण्यास ठाम नकार दिल्यानंतर तिच्या धाकट्या बहिणीला तयार करून वरमाळ घालण्यासाठी पाठवण्यात आले. ती जेव्हा मंडपात आली तेव्हा टुनटुन याला त्याची होणारी पत्नी बदलल्याचा संशय आला. त्याने लग्नास नकार देत पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटला नाही. अखेरीस पोलिसांनी सर्वांची पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली.
अखेरीस ठाण्याचे प्रमुख संजीव कुमार दुबे यांनी सगळ्यांची समजूत काढून पोलीस ठाण्याजवळ असलेल्या संतोषीमाता मंदिरामध्ये टुनटुन आणि सपना यांचं लग्न लावून दिलं. पोलिसांच्या उपस्थितीतच सर्व विधी संपन्न झाले.