इकडे महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद, तिकडे ओवेसी यांनी केली मोठी मागणी! म्हणाले, अल्पसंख्यक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 18:00 IST2024-06-22T18:00:10+5:302024-06-22T18:00:40+5:30
एआयएमआयएमचे (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे.

इकडे महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद, तिकडे ओवेसी यांनी केली मोठी मागणी! म्हणाले, अल्पसंख्यक...
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघत आहे. ओबीसी कोट्यातून माराठा समाजाला आरक्षण देऊ नये, या मागणीला घेऊन आता राज्यातील ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. यातच आता, एआयएमआयएमचे (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे.
एक-मेकांचे भांडण लावतंय सरकार -
हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी एक्सवर एक बातमी पोस्ट कर म्हटले आहे, "निवडणूक काळात मोदी म्हणत होते की, ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या आरक्षणाला मुस्लिमांपासून धोका आहे. आज ओबीसी आणि मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण आहे. कारण आरक्षणाची सीमा 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित आहे. भारतातील अल्पसंख्यक, मागास आणि अतिमागास यांच्यात भाकरीसाठी भांडण लावली जात आहेत आणि मलाई कुणी दुसरेच खात आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात 400-पार सरकारने दुरुस्ती करून 50 टक्क्यांची मर्यादा संपुष्टात आणायला हवी."
ओबीसी आरक्षण बचाव उपोषण तूर्तास स्थगित -
आज दुपारी सव्वा दोन वाजता शासनाचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यानंतर, हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी तब्बल दहा दिवसांपासून सुरू उपोषण सोडले.
दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत, सगेसोयरेचा आदेश आणखी आला नाही, तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आले आहे. इतर मागण्यांवर शासनाची श्वेत पत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे हाके यांनी जाहीर केले.
१० दिवसांत काय घडले? -
सर्व मराठा कुणबी आहेत. त्यांना तसे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी सगेसोयरेचा आदेश शासनाने काढावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मात्र, सरसकट मराठा ओबीसीमध्ये आल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, असे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन उभारून लक्ष्मण हाके सहकारी नवनाथ वाघमारे यांच्यासह वडीगोद्री येथे उपोषणाला बसले. शुक्रवारी, उपोषणाच्या ९ व्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळत चालली असताना सरकारी यंत्रणा सक्रिय झाली. ओबीसी शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर हाके यांनी केलेल्या काही मागण्या पूर्ण करण्यात आल्या. आज दुपारी याबाबतचे पत्र घेऊन सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले. सरकारचे मागणी मान्य झालेले पत्र आणि इतर मागण्यांवरचे आश्वासन ग्राह्य धरून हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याचे जाहीर केले. मात्र, लढा आणखी सुरूच राहिले असेही हाके या वेळी म्हणाले.