पत्नीसोबत वाद, घटस्फोटाचा खटला, कोर्टाने लालूंचे पुत्र तेजप्रताप यांना दिला धक्का, दिले असे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:13 AM2023-10-13T09:13:19+5:302023-10-13T09:14:03+5:30
Relationship: लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्यामध्ये घटस्फोटाचा खटला सुरू आहे. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्यामध्ये घटस्फोटाचा खटला सुरू आहे. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यामध्ये कोर्टाने याचिकाकर्ते तेजप्रताप यादव यांनी एक महिन्याच्या आत ऐश्वर्या यांच्या राहण्याची व्यवस्था करावी. तसेच त्यांच्या घराचं भाडं आणि वीजबिलाचा खर्चही करावा, असे आदेश दिले आहेत. तसेच तेजप्रताप यांनी ऐश्वर्याविरोधात कुठलीही कौटुंबिक हिंसाचाराची कृती करू नये, असे आदेशही दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे.
तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. पाटणा येथील कौटुंबिक न्यायालयात जेव्हा हे प्रकरण पोहोचले तेव्हा ऐश्वर्या यांनी तेजप्रताप यादव यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यावेळी कोर्टाने घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी करताना ऐश्वर्या यांच्या पोटगीसाठी भत्ता निश्चित केला. मात्र कौटुंबिक हिंसेपासून संरक्षणाबाबत ऐश्वर्या यांना दिलासा दिला नाही. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. ऐश्वर्या यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हायकोर्टाने ही याचिका स्वीकार करून सुनावणी करताना कनिष्ठ न्यायायालयाचा निर्णय पलटवला. हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाला कौटुंबिक हिंसेप्रकरणी पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले. हायकोर्टातील न्यायमूर्ती जस्टिस पी.बी. बैजंथ्री आणि अरुण कुमार झा यांच्या बेंचने बुधवारी या प्रकरणात सुनावणी केली आणि कनिष्ठ न्यायालयाने २१ डिसेंबर २०१९ रोजी दिलेला निकाल पलटला. तसेच कौटुंबिक हिंसेबाबत पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
तेजप्रताप यादव यांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. मातर लग्नाच्या सहा महिन्यातच तेजप्रताप यादव यांनी पाटणा हायकोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ऐश्वर्या यांचे पती चंद्रिका राय हे आरजेडीचे नेते आहेत. घटस्फोटाबाबत माहिती देताना तेजप्रताप यांनी सांगितले की, मी एक सामान्य जीवन जगणारा व्यक्ती आहे. तर ऐश्वर्या मॉर्डन जीवनशैली जगणारी आहे. तिच्यासोबत संसार करणं कठीण आहे. तसेच हा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध झाला आहे. दोन राजकीय कुटुंबातील या नात्यामध्ये मी एक मोहरा ठरलो आहे. मी गुदमरणारं जीवन जगू शकत नाही.