अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; न्यायालयानं निकाल राखून ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:09 PM2019-10-16T16:09:37+5:302019-10-16T16:38:43+5:30
Ram Mandir Case : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता
नवी दिल्ली: कित्येक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेर पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. गेल्या ४० दिवसांपासून अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. अखेर आज या प्रकरणातील शेवटचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यामुळे लवकरच या प्रकरणात न्यायालय निकाल देऊ शकतं.
अयोध्येतील ऐतिहासिक जमीन वाद प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठानं सुनावणी घेतली. रंजन गोगोई १८ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. आज सुनावणीच्या अखेरच्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांमध्ये युक्तिवादादरम्यान शाब्दिक चकमक झाली. यावेळी मुस्लिम पक्षकारांच्या वकिलानं हिंदू पक्षाच्या वतीनं जमा करण्यात आलेला नकाशा फाडला.
Arguments conclude in the #AyodhyaCase , Supreme Court reserves the order. pic.twitter.com/74JQXGj7r7
— ANI (@ANI) October 16, 2019
मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलानं नकाशा फाडताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'आम्ही अशा प्रकारे सुनावणी सुरू ठेवू शकत नाही. लोक कधीही उभे राहून बोलू लागतात. आम्हीदेखील उभे राहू शकतो आणि या प्रकरणाची सुनावणी संपवू शकतो,' असं संतप्त उद्गार गोगोईंनी काढले.
सुनावणीच्या ४० व्या दिवशी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी एक पुस्तक आणि काही दस्तावेज यांच्यासह वादग्रस्त राज जन्मभूमीची ओळख पटवून देणारा नकाशा न्यायालयासमोर ठेवला. मात्र मुस्लिम पक्षकारांच्या बाजूनं युक्तिवाद करणाऱ्या वकील राजीव धवन यांनी नकाशावर आक्षेप घेतला. मला हा दस्तावेज फाडण्याची परवानगी आहे का?, असं म्हणत त्यांनी नकाशाचे तुकडे केले.