'मदरशांमध्ये मुलांना कट्टर बनवतात, शिरच्छेद करायला शिकवतात', आरिफ मोहम्मद खान यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:05 PM2022-06-29T16:05:53+5:302022-06-29T16:12:35+5:30
Udaipur Murder: काल झालेल्या कन्हैया लालच्या हत्येमुळे देशात कट्टरतावाद्यांविरोधात संतापाचे वातावरण आहे. यावरुन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मदरशांच्या शिक्षणावर मोठे विधान केले आहे.
Udaipur Murder: मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अनेकजण या प्रकरणावर व्यक्त होत आहेत. यातच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. मदरसे हे द्वेषाचे मूळ असल्याचे आरिफ मोहम्मद यांचे म्हणणे आहे.
'मुलांना कट्टर बनवले जात आहे'
आरिफ मोहम्मद म्हणाले, 'आमच्या मुलांना निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुस्लीम कायदा कुराणातून आलेला नाही, तो काही व्यक्तींनी लिहिला आहे. त्यात त्यांनी शिरच्छेदाचा कायदा लिहिला आणि हाच कायदा मदरशात मुलांना शिकवला जातोय.'
अनेकदा ते कट्टरतेवर टीका करतात
आरिफ मोहम्मद खान अनेकदा कट्टरतेवर टीका करताना दिसतात. ते म्हणतात की, मौलाना आणि मदरसे मुस्लिमांच्या एका वर्गाला कट्टरपंथी बनवत आहेत. ते गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवतात, यामुळेच बालपणात मुलांमध्ये इतर धर्मांबद्दल द्वेष निर्माण होतो. यामुळे ही मुले मोठी झाल्यानंतर इतर धर्माच्या लोकांबद्दल सावध राहतात आणि नेहमी संशयाने भरलेले असतात. आरिफ मोहम्मद यांच्या या विचारांवर अनेकदा टीकाही होते.
कन्हैया लालवर 26 वार
काल राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची त्याच्या दुकानात घुसून हत्या करण्यात आली. दोन मुस्लिम तरुण त्याच्या दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने आले आणि कन्हैयावर चाकूने वार केला. या रानटी हल्ल्यात कन्हैया लालचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मारेकर्याने कन्हैया लालवर 26 वार केल्याचे समोर आले आहे. रियाझ अन्सारी आणि मोहम्मद घौस अशी आरोपींची नावे असून, त्यांना उदयपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या राजसमंद येथून अटक करण्यात आली.