‘अरिहंत’च्या यशाने त्रिविध संरक्षणसिद्धता, आण्विक पाणबुडीचे मोदींकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:03 AM2018-11-06T06:03:13+5:302018-11-06T06:03:40+5:30
पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रधारी आण्विक पाणबुडीने देशाच्या सागरी हद्दीत जरब बसविण्यासाठी पहिली गस्ती सफर यशस्वी केल्याने भारताची त्रिविध आण्विक संरक्षणसिद्धता सोमवारी जगजाहीर झाली.
नवी दिल्ली : पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रधारी आण्विक पाणबुडीने देशाच्या सागरी हद्दीत जरब बसविण्यासाठी पहिली गस्ती सफर यशस्वी केल्याने भारताची त्रिविध आण्विक संरक्षणसिद्धता सोमवारी जगजाहीर झाली. यामुळे भारताकडे शत्रूच्या लक्ष्यावर जमीन, आकाश आणि पाण्याखालूनही अण्वस्त्रांचा अचूक मारा करण्याची सज्जता पूर्ण झाली आहे.
पहिल्या गस्ती सफरीवरून परतलेल्या ‘अरिहंत’च्या अधिकाऱ्यांचे आणि नाविकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत औपचारिक स्वागत केले. ‘अरिहंत’च्या यशाने भारताची त्रिविध अण्वस्त्रसिद्धता पूर्ण झाल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आणि या यशाबद्दल नौदलाच्या व वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप
दिली. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार मोदींनी संपूर्ण देशासाठी ही एक फार मोठी कामगिरी असल्याचे नमूद केले आणि ‘आयएनएस अरिहंत’ आपल्या नावाप्रमाणे देशाच्या १३० कोटी नागरिकांचे बाह्य धोक्यांपासून संरक्षण करून भारतासभोवतालच्या क्षेत्रात शांततेचे वातावरण सुनिश्चित करण्यात मोठे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला.
सैन्यदलांचे शौर्य आणि वैज्ञानिकांचे बुद्धिकौशल्य यांचे कौतुक करताना मोदी यांनी म्हटले की, यांच्या अथक परिश्रमामुळे अणुचाचणीतून संपादित केलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून देशाच्या संरक्षणासाठी अण्वस्त्रसिद्धतेचे त्रिकूट साध्य करणे शक्य झाले आहे. या यशाने भारताची क्षमता व ती सिद्ध करण्यातील निर्धार याविषयीच्या शंकांचेही ठामपणे निरसन झाले आहे.
‘अरिहंत’ नौदलात दाखल झाल्याचे याआधी कधीही अधिकृतपणे जाहीर केले गेले नव्हते. या पाणबुडीचे जलावतरण सन २००९ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले होते. तेव्हापासून असंख्य नानाविध चाचण्या यशस्वी झाल्यावर ती आॅगस्ट २०१६ मध्ये नौदलात दाखल झाली. ‘अरिहंत’ ८३ मेवॅ क्षमतेच्या अणुभट्टीवर चालते व ती अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.
‘अरिहंत’चे महत्त्व
अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे म्हणजेच त्यांचा फक्त बचावासाठी वापर करण्याचे भारताचे धोरण आहे. त्यादृष्टीने प्रतिहल्ल्याचे साधन म्हणून ‘अरिहंत’ अधिक परिणामकारक ठरेल.
कारण जमीन आणि हवेतून सोडता येणारी अण्वस्त्रे शत्रूला हुडकून काढणे तुलनेने सोपे आहे; परंतु कोणताही आवाज न करता पाण्याखाली वावरणारी पाणबुडी हे गनिमी
अस्त्र आहे.