अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:40 AM2020-01-15T10:40:03+5:302020-01-15T10:41:00+5:30
विधाने व्हायरल झाल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी रामायण आणि महाभारत काळातील घटनांचे उदाहरण देऊन केलेल्या दाव्यांमुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महाभारताच्या काळात अर्जुनाने वापरलेल्या बाणांमध्ये अणुशक्ती होती, असा दावा धनखड यांनी केला आहे. तसेच रामायण काळात पुष्पक विमान अस्तित्वात होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित करताना जगदीप धनखड म्हणाले की, ''20 व्या शतकात नव्हते, पण रामायण काळाता आपल्याकडे उडणाऱ्या वस्तू म्हणजेच पुष्पक विमान होते. महाभारताचा विचार केल्यास संजयने प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जाता महाभारताचे संपूर्ण युद्ध धृतराष्ट्राला ऐकवले होते. संजयकडे टीव्ही नव्हता. पण दिव्यदृष्टीसारखी काही शक्ती होती. तसेच महाभारतावेळी अर्जुनाने वापरलेल्या धनुष्याच्या बाणांमध्ये अणुशक्ती होती,'' असा दावाही धनखड यांनी केला.
दरम्यान, ही विधाने व्हायरल झाल्यानंतर जगदीप धनखड यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. मात्र धनखड यांच्या विधानावरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी काही दिवसांपूर्वी धनखड यांनी आपले एक छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले होते. तसेच त्या छायाचित्रात दिसत असलेल्या टेबलावर लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणी संबंधीच्या कागदपत्रांवर सही केली होती, असे सांगत ते टेबल ऐतिहासिक असल्याचा दावा केला होता. दरम्यान, या पोस्टमुळे धनखड यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.