‘अर्जुना’चा बाण कोणाकडे? एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:21 AM2022-07-26T06:21:38+5:302022-07-26T06:22:15+5:30
एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्येच? खोतकरांचे तळ्यात-मळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिवसेनेचे माजी मंत्री आणि उपनेते अर्जुन खोतकर यांच्याबद्दल दररोज वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. त्यातच ते सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा असून, त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही होते. त्यामुळे खोतकरांनी शिंदेंसोबत हातमिळवणी केली का याची दिवसभर चर्चा होती; परंतु खोतकरांकडून ठोस प्रतिक्रिया मिळू न शकल्याने याबद्दल खोतकरांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचे चित्र आहे.
गेल्याच आठवड्यात खोतकर हे दिल्लीत होते, त्यावेळी महाराष्ट्र सदनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही होते. त्यावेळी समोरासमोर भेट झाल्यावर आपण मुख्यमंत्री शिंदेंना नमस्कार केला. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे खोतकरांनी सांगून आपण शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट केले. परंतु रविवारी सायंकाळच्या विमानाने खोतकरांनी दिल्ली गाठली. सोमवारी सकाळी रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे, स्वत: दानवे आणि खोतकर यांच्यात अर्धा तास गुफ्तगू झाली. नंतर शिंदेंचा सत्कार करताना खोतकर व अन्य खासदारांनी छायाचित्रही काढले.
दानवे -खोतकर यांच्यात समेट
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत अर्जुन खोतकर आणि आमच्यात चर्चा झाल्याचे मान्य करून राजकीय वाद मिटवून सोबत राहण्याचे सांगितले. ते आपण मान्य केल्याचे दानवे यांनी सांगितले. खोतकरांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली नाही.
...तोपर्यंत केवळ चर्चाच
याबाबत खोतकरांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. याबाबत जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी खोतकरांच्या एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या वृत्ताचा इन्कार करून जोपर्यंत अर्जुन खोतकर हे स्वत: त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत या केवळ चर्चाच समजा, असे सांगितले.