अर्जुनाच्या बाणात ‘आण्विक शक्ती’ होती; बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:42 AM2020-01-16T03:42:37+5:302020-01-16T03:43:02+5:30
सोशल मीडियातून टीका आणि खिल्ली
कोलकाता : रामायणाच्या काळातही भारतात हवेत उडणारी उपकरणे होती आणि महाभारतातील अर्जुनाच्या बाणामध्ये तर आण्विक शक्ती होती, अशी विधाने करणारे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्यावर सोशल मीडियातून टीका सुरू झाली आहे.
कोलकात्यातील बिर्ला इंडस्ट्रिअल अॅण्ड टेक्नॉलॉजिकल म्युझियमचे उद्घाटन राज्यपाल धनकड यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर बोलताना राज्यपाल म्हणाले की, भारताला अनेक शतकांपासून विज्ञानाचे ज्ञान होते. विमानांचा शोध नंतर १९१0 च्या सुमारास लागला आहे; पण वेदांचा तुम्ही अभ्यास केला, तर रामायणाच्या काळातही आपल्याकडे हवेत उडणारी उपकरणे (विमाने) होती, असे तुमच्या लक्षात येईल.
महाभारताचा उल्लेख करून राज्यपाल धनकड म्हणाले की, त्या काळात टीव्हीसारखी माध्यमे नव्हती. तरीही युद्धभूमीवर नसलेल्या संजयने संपूर्ण युद्धाची साद्यंत माहिती धृतराष्ट्राला दिली. कारण संजयकडे दिव्यदृष्टी होती. अर्जुनाच्या बाणामध्ये तर आण्विक शक्ती होती, असा दावाही राज्यपालांनी केला. आपण त्या काळात अतिशय शक्तिशाली होतो. त्यामुळे भारताकडे (या ताकदीकडे) दुर्लक्ष करणे जगाला अजिबात परवडणार नाही.
अशी विधाने करणारे जगदीप धनकड हे पहिलेच नाहीत. भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वीही अशी विधाने केली आहेत. गायीच्या दुधात सोने असते, असे वक्तव्य पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी मध्यंतरी केले होते. त्याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी महाभारताच्या काळात इंटरनेटची सोय होती आणि त्यामुळे युद्धभूमीवर काय चालले आहे, याची माहिती संजयने धृतराष्ट्राला दिली, असे विधान केले होते.
शिक्षण क्षेत्रातील मंडळींची टीका
राज्यपाल हे संबंधित राज्यांतील विद्यापीठांचे कुलगुरू असतात. त्यामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने कसलेही पुरावे न देता, अशी विधाने करणे धक्कादायक आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यूक्लीअर फिजिक्सचे प्राध्यापक बिकाश सिन्हा यांनी राज्यपालांची विधाने तथ्यहीन, बेजबाबदार आणि निरर्थक असल्याची टीका केली आहे. प्रा. प्रसंता राय यांनीही राज्यपालांवर टीका केली असून, ते भाजपचा अजेंडा राबवू पाहत आहेत, असे म्हटले आहे. याशिवाय सोशल मीडियातूनही जगदीप धनकड यांच्यावर टीका होत असून, काही जणांनी त्यांची खिल्लीही उडवली आहे.