गुरूग्राममध्ये मुस्लीम कुटुंबावर सशस्त्र हल्ला, पाकिस्तानात जाण्यास सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 01:40 AM2019-03-24T01:40:50+5:302019-03-24T01:41:04+5:30
येथील भोंडसी परिसरातील एका मुस्लीम कुटुंबावर सशस्त्र टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. जमावाने कुटुंबाला धर्मावरून शिवीगाळही केली, तसेच त्यांना पाकमध्ये जाण्यास सांगून धमकावले.
गुरुग्राम : येथील भोंडसी परिसरातील एका मुस्लीम कुटुंबावर सशस्त्र टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. जमावाने कुटुंबाला धर्मावरून शिवीगाळही केली, तसेच त्यांना पाकमध्ये जाण्यास सांगून धमकावले.
मोहंमद दिलशाद (२८), रा. भूपसिंगनगर याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण आपल्या चुलत भावासोबत मैदानावर क्रिकेट खेळत असताना दोन लोक मोटारसायकलीवरून आले. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून पाकिस्तानात जा, असे सांगितले.
दिलशादच्या चुलत्याने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यास मारहाण केली. त्यानंतर आरोपी निघून गेले. मात्र, थोड्या वेळाने दोन मोटारसायकलींवर आणखी काही लोक घेऊन आले. काही लोक चालतही आले. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आणि सळया होत्या. त्यांनी घरात घुसून महिला व मुलांना मारझोड केली, तसेच घर रिकामे करण्याची धमकी दिली. काही जखमींना दिल्लीच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मुस्लिम एकता मंचचे चेअरमन हाजी शाहजाद खान यांनी सांगितले की, मुस्लिम आता आपल्या घरातही सुरक्षित राहिलेले नाहीत. आरोपींना तात्काळ अटक व्हायला हवी.
पोलीस म्हणतात, भांडण क्रिकेटवरून
खान यांनी सांगितले की, पीडित कुटुंब एवढे घाबरले आहे की, ते हल्लेखोरांची नावे घ्यायलाही तयार नव्हते. मी मध्यस्थी केल्यानंतरच त्यांनी हल्लेखोरांची नावे सांगितली. मी पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकेन यांनी सांगितले की, एकाच मैदानात क्रिकेट खेळण्यावरून झालेले हे भांडण आहे. त्यास जातीय स्वरूप नाही. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.