मध्य प्रदेशातून आणले शस्त्र
By Admin | Published: November 21, 2014 02:30 AM2014-11-21T02:30:28+5:302014-11-21T02:30:28+5:30
टीम हॅप्पी न्यू ईयर आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येसाठी गँगस्टर रवी पुजारी टोळीने मध्य प्रदेशातून मोठा शस्त्रसाठा मुंबईत आणल्याचे स्पष्ट झाले आहे
मुंबई : टीम हॅप्पी न्यू ईयर आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येसाठी गँगस्टर रवी पुजारी टोळीने मध्य प्रदेशातून मोठा शस्त्रसाठा मुंबईत आणल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अटक आरोपींच्या चौकशीतून टोळीने तब्बल ६ रिव्हॉल्व्हर आणि किमान ३० काडतुसे गाडीत दडवून मुंबईत आणल्याची माहिती समोर आली आहे.
आतापर्यंतच्या तपासात गुन्हे शाखेने पाच रिव्हॉल्व्हर, २१ काडतुसे हस्तगत केली होती. चौकशीत आणखी एक रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे अश्फाक अब्दुल रशीद सय्यद ऊर्फ बचकाना याने मुंब्य्रातील निवासस्थानी दडवून ठेवल्याची माहिती समोर आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री त्याच्या घरी धाड घालून हा शस्त्रसाठा हस्तगत केला.
अनीस-उबेद यांच्यातील व्हॉट्सअॅप
पुजारीचा खास हस्तक आणि या गुन्ह्यांसाठी तयार केलेल्या मॉड्यूलचा हॅण्डलर अनीस मर्चंटने अमेरिकेत स्थायिक असलेला सख्खा भाऊ उबेद याच्याशी गुन्ह्यापूर्वी व नंतर व्हॉट्सअॅपवर अनेकदा संवाद साधला होता. हे संभाषण अनीसच्या मोबाइलमधून हस्तगत केले आहे. त्यात पुजारीकडून या गुन्ह्यांसाठी धाडण्यात येणारी रोकड,
गुन्ह्याचे स्वरूप, रूपरेषा याबाबत उल्लेख आढळल्याची माहिती
मिळते. दुसरीकडे उबेदनेच अमेरिकेहून पुजारीचे ११ लाख रुपये टप्प्याटप्प्याने अनीसपर्यंत पोहोचवल्याचा दाट संशय गुन्हे शाखेला आहे.
या पार्श्वभूमीवर उबेदला या
गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे. (प्रतिनिधी)