लष्कराला, एअर फोर्सला 'तेजस', अर्जुन रणगाडयाचे अॅडव्हान्स व्हर्जन नको, परदेशी रणगाडे, फायटर विमानांना दिली पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 11:48 AM2017-11-13T11:48:57+5:302017-11-13T12:07:52+5:30
लष्कराने मागच्याच आठवडयात 1,770 रणगाडयांच्या खरेदीसाठी प्राथमिकस्तरावरील निविदा मागवल्या आहेत.
नवी दिल्ली - स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तेजस आणि अर्जुन रणगाडयाच्या नवीन व्हर्जनच्या प्रस्तावाला भारतीय हवाई दल आणि लष्कराने विरोध दर्शवला आहे. तेजस आणि अर्जुन रणगाडयाच्या नव्या व्हर्जनची निर्मिती करु नये असे हवाई दल आणि लष्कराचे मत आहे. त्याऐवजी स्ट्रॅटजिक पार्टनरशिप धोरणातंर्गत मेक इन इंडियाच्या माध्यमातून परदेशी बनवाटीची सिंगल इंजिन फायटर जेट आणि रणगाडयांची निर्मिती करावी असे भारतीय सैन्यदलाचे मत आहे.
लष्कराने मागच्याच आठवडयात 1,770 रणगाडयांच्या खरेदीसाठी प्राथमिकस्तरावरील निविदा मागवल्या आहेत. या रणगाडयांना फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेईकल्स म्हटले जाते. या रणगाडयांमुळे युद्धाच्या प्रसंगात शत्रूवर वर्चस्व मिळवता येऊ शकते. भारतीय हवाई दलही लवकरच 114 सिंगल इंजिन फायटर विमानांसाठी अशाच प्रकारची निविदा मागवू शकते.
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारताची अनुभव कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने स्ट्रॅटजिक पार्टनरशिप धोरणावर भर दिला आहे. नव्या धोरणामुळे भारतातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांसाठीही शस्त्रास्त्र निर्मितीची दारे खुली होणार आहेत. परदेशातील आघाडीच्या शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांबरोबर भागीदारी करुन भारतीय कंपन्यांना शस्त्रास्त्र निर्मिती करता येईल. यामुळे तंत्रज्ञान हस्तांतरण सुद्धा शक्य होणार आहे.
भारतीय हवाई हद्दीच्या संरक्षणासाठी एकटया 'तेजस'वर अवलंबून चालणार नाही. स्वदेशी बनावटीचे हे लढाऊ विमान स्वसंरक्षणासाठी पुरेसे ठरणार नाही असे भारतीय हवाई दलाकडून केंद्र सरकारला स्पष्ट करण्यात आले आहे. अन्य देशांकडून सिंगल इंजिन लढाऊ विमाने खरेदी करण्यायाचा विचार सोडून द्या असे केंद्राकडून सांगण्यात आल्यानंतर हवाई दलाने सरकारला तेजसच्या क्षमतेची कल्पना दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. जेएएस 39 ग्रिपेन, एफ-16 या लढाऊ विमानांशी तेजस स्पर्धा करु शकत नाही. ग्रिपेन, एफ-16 च्या तुलनेत तेजसमध्ये अजून भरपूर सुधारणांची आवश्यकता आहे असे हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रिपेन हे स्वीडीश बनावटीचे तर एफ-16 हे अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीने बनवलेले फायटर विमान आहे. परदेशी लढाऊ विमानांऐवजी स्वदेशी बनावटीच्या भारतीय लढाऊ विमानांना प्राधान्य द्या असे केंद्राकडून हवाई दलाला सांगण्यात आले होते. त्यावर हवाई दलाने सरकारसमोर प्रेझेंटेशन सादर केले व एकटे तेजस भारताच्या सर्व हवाई गरजा पूर्ण करु शकत नाही ते निदर्शनास आणून दिले. युद्धाच्या प्रसंगात तेजस फक्त 59 मिनिटे तग धरु शकते तेच ग्रिपेन तीन तास तर एफ-16 चार तास लढण्यास सक्षम आहे.
तेजस फक्त तीन टनांचे पे-लोड वाहू शकते तेच ग्रिपेन सहा आणि एफ-16 सात टनाचे पे-लोड वाहून नेण्यास सक्षम आहे. इंडिया टुडेला मिळालेल्या कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या टार्गेटला नष्ट करण्यासाठी 36 बॉम्बची आवश्यकता असेल तर अशावेळी सहा तेजस विमाने तैनात करावी लागतील तर ग्रिपेन आणि एफ-16 ची तीन विमानेही यासाठी पुरेशी आहेत.