अयोध्येत जमीन व्यवहारचा फटका लष्करालाही; राखीव जागेवर उभारली शाळा व गोदामे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 11:10 AM2024-07-14T11:10:44+5:302024-07-14T11:16:42+5:30
अयोध्येतील जमिनीच्या व्यवहारांचा फटका सैन्यालाही बसला आहे
त्रियुग नारायण तिवारी
अयाेध्या : अयाेध्या जिल्ह्यातील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. या व्यवहारांमध्ये अयाेध्येतील सर्व लाेकप्रतिनिधी सामील आहेत. जमिनीच्या व्यवहारांचा फटका सैन्यालाही बसला आहे.
लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी १३,३९१ एकर जमीन आरक्षित केली हाेती. भूमाफिया, शिक्षण माफिया आणि नेत्यांनी मिळून या जमिनीवर शाळा आणि गाेदामे बनविली. अनेक जमिनींवर घरे बांधली आहेत. लष्करासाठी आरक्षित जमिनीवर अयाेध्या विकास प्राधिकरणाने नकाशालाही मंजुरी दिली आहे.
प्राधिकरणाने इथे काेणताही नकाशा मंजूर होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने जमिनी रिकाम्या करण्याचे आदेश दिले. मग जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून लष्करालाच समितीच्या मदतीने जमीन रिकामी करून घ्यावे, असे म्हटले.
अरुणाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचेही नाव
अयाेध्येतील जमिनींच्या खरेदीमध्ये अरुणाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचेही नाव आहे. त्यांनी ३.९९ हेक्टर जमीन खरेदी केली आहे. याशिवाय भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह, तसेच त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांनीही बरीच जमीन खरेदी केलेली आहे.
उत्तर प्रदेशचे एसटीएफ प्रमुख अमिताभ यांनीही त्यांची आई गीता सिंह यांच्या नावाने बरीच जमिनी विकत घेतली आहे. आता याची विक्री भूमाफिया करत असल्याचे समजते.
यांचीही नावे यादीत
पाेलिस महानिरीक्षक संजीव गुप्ता यांनी पत्नी डाॅ. चेतना तसेच शिक्षण अधिकारी अरविंद पांडे यांची पत्नी ममता यांच्या नावे जमीन घेतल्याची चर्चा आहे. अमेठीचे एसपी अनुप कुमार, आ. अजय सिंह, माजी आ. जितेंद्र सिंह बबलू, चंद्र प्रकाश शुक्ला, गीता सिंह, महाबल प्रसाद यांची नावे जमीन खरेदीदारांच्या यादीत आहेत.