लष्कर छावणीवर हल्ले

By admin | Published: December 6, 2014 03:18 AM2014-12-06T03:18:32+5:302014-12-06T03:18:32+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने खवळलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गटांनी शुक्रवारी १२ तासांत चार भीषण हल्ले केले

Army attacks on the camp | लष्कर छावणीवर हल्ले

लष्कर छावणीवर हल्ले

Next

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने खवळलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गटांनी शुक्रवारी १२ तासांत चार भीषण हल्ले केले. उरी भागात शुक्रवारी पहाटे लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यांमध्ये एका लेफ्टनंट कर्नलसह लष्कर व पोलीस दलाचे एकूण ११ जवान शहीद झाले. या हल्ल्याला जवानांनी तत्काळ चोख प्रत्युत्तर देऊन सात दहशतवाद्यांना टिपले. या चकमकीत एक नागरिक ठार झाला. श्रीनगरच्या त्राल व शोपिया भागातही भारतीय छावण्यांवर अनेक हल्ले चढविण्यात आले.
दहशतवाद्यांनी शोपिया भागातही एका पोलीस पथकाला आपले लक्ष्य बनविल्याची घटना घडली. मोहरा भागात शुक्रवारी पहाटे ३च्या सुमारास अत्याधुनिक शस्त्रांनिशी दहशतवाद्यांनी लष्कराच्या शिबिरावर गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनीही तत्काळ प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला सुरू केला. ही धुमश्चक्री सहा तास सुरू होता. या हल्ल्यात पंजाब रेजिमेंटचे ले. कर्नल संकल्प कुमार यांच्यासह लष्कराचे आठ जवान, तर राज्य पोलीस दलातील एक पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक व दोन कॉन्स्टेबल शहीद झाल्याचे सांगण्यात आले. त्राल भागात दहशतवाद्यांनी एका बसस्थानकावर केलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात गुलाम हसन मीर हा नागरिक ठार झाल्याचे तर सहा जण जखमी झाल्याचे जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक अब्दुल गनी मीर यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या दौ-याआधी साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी हे हल्ले झाले आहेत. उत्तर काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यातील उरी हा भाग श्रीनगरपासून १०० कि.मी. अंतरावर व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असून, ९ डिसेंबर रोजी येथे जम्मू-काश्मीर विधानसभेकरिता तिसऱ्या टप्प्यातले मतदान होणार आहे.

>पाकने पावले उचलावी

जम्मू विभागातील राजोैरी येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटना रोखण्यासाठी पाकने तातडीने पावले उचलली पाहिजेत, असे म्हटले आहे. जर पाकला तसे करण्यात अडचणी असतील तर त्याने भारतासोबत बोलावे; भारत त्यांना मदत करेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

> लष्कराच्या चार जवानांचे मृतदेह दहशती हल्ल्यात जळाले असून, एका मृतदेहावर भाजल्याच्या खुणा आहेत. अन्य तीन जवानांच्या मृतदेहावर गोळ्यांच्या जखमा आहेत.
च्ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे असलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सहा एके५६ रायफल्स, ५५ काडतुसे, दोन शॉटगन, दोन दुर्बिणी, ४ रेडिओ सेट्स, ३२ ग्रेनेड्स व मोठ्या प्रमाणावर इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली.

> निवडणुकीच्या तोंडावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविणे सुरू केले असून, त्याला भारताकडून चोख उत्तर दिले जाईल.
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

> कमांडर ठार
श्रीनगरच्या बाहेरील भागात सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तय्यबाच्या एका प्रमुख कमांडरला तो शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना ठार केले. त्याच्यासोबतच्या दुसऱ्या दहशतवाद्यालाही पोलिसांनी कंठस्नान घातले.

> लष्कराच्या छावणीवर झालेला दहशती हल्ला हा शांतता व सामान्य स्थितीस बाधा आणण्याचा विफल प्रयत्न आहे.
- मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

Web Title: Army attacks on the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.