२० लाखांसाठी आर्मी कॅप्टन भूपिंदर सिंहने रचलं मोठं षडयंत्र; जाणून घ्या, ‘त्या’ दिवशी काय घडलं?
By प्रविण मरगळे | Published: January 11, 2021 09:47 AM2021-01-11T09:47:06+5:302021-01-11T09:48:48+5:30
सोशल मीडियात हे समोर आलं की, या तीन युवकांचा दहशतवादाची काहीही संबंध नाही, तेव्हा लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले
जम्मू – शोपियानमध्ये मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या कथित चकमकीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्मी कॅप्टने २० लाखांच्या बक्षिसासाठी दोन लोकांसोबत मिळून षडयंत्र रचलं. या बनावट चकमकीत ३ युवकांना मारण्यात आलं, या आरोपात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सैनिकांनी घेरण्यापूर्वीच कॅप्टने या युवकांना गोळी मारली होती. सध्या कॅप्टन भूपिंदर सिंह अटकेत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार आर्मी कॅप्टन भूपिंदर सिंह यांचे कोर्ट मार्शल होऊ शकते. हे प्रकरण १८ जुलै २०२० मध्ये अम्शीपुरा चकमकीसंदर्भात आहे. ज्यात राजौरी जिल्ह्यातील तीन युवक इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इबरार यांना ठार करण्यात आलं. या युवकांना दहशतवादी असल्याचं बोललं गेले. जिल्हा न्यायाधीशांसमोर पोलिसांच्या आरोपपत्रात या चकमकीत सहभागी तबीश नजीर आणि बिलाल अहमद लोन यांच्याही भूमिकेचा उल्लेख आहे. लोन हा सरकारी साक्षीदार बनला असून त्याचा जबाब न्यायाधीशांसमोर घेण्यात आला आहे.
सोशल मीडियात हे समोर आलं की, या तीन युवकांचा दहशतवादाची काहीही संबंध नाही, तेव्हा लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले, ज्याचा तपास सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला. अम्शीपुरामध्ये मारल्या गेलेले तीन युवकांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह ऑक्टोबरमध्ये बारामूला येथील त्यांच्या कुटुंबांना सोपवण्यात आले. या प्रकरणात कॅप्टनवर प्रथमदर्शनी विशेषाधिकार नियमांचे उल्लंघन आणि लष्करी शिस्तभंग केल्यामुळे कारवाई सुरू करण्यात आली होती.
जनरल ऑफिसर इन कमांड लेफ्टनंट बी एस राजू म्हणाले की, समरी ऑफ एविंडस पूर्ण झाले असून लष्करी कायद्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. अधिकाऱ्यांनी कॅप्टन भूपिंदर सिंहला १९९० च्या विशेषाधिकाराचं उल्लंघन करणे व लष्कर प्रमुख यांच्या आदेशाचे पालन न करणे यासाठी कोर्ट मार्शलच्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो. जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणी ७५ साक्षीदार नोंदवले आहेत आणि पुरावा म्हणून आरोपींचे कॉल डेटा माहिती जोडण्यात आली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन नागरिकांसोबत लष्कराचे पथक एकत्र निघाले होते, त्याठिकाणी दहशतवाद्यांशी सामना होऊ शकतो अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहचल्यानंतर सैनिकांना चारीबाजूने घेरण्यास सांगितले. सैनिकांच्या जबाबानुसार जेव्हा आम्ही वाहनातून उतरलो तेव्हा परिसरात घेराव टाकण्यापूर्वीच काही गोळ्यांचे आवाज ऐकू आले. तेव्हा कॅप्टन सिंहने सांगितले की, दहशतवादी पळण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे गोळ्या चालवाव्या लागल्या. आरोपपत्रानुसार कॅप्टन सिंह आणि इतर दोघांनी चकमकीचं नाटक बनवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. २० लाख रुपये बक्षिसासाठी हे नाटक रचलं गेले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती दिली गेली असंही गुन्ह्यात नमूद करण्यात आलं आहे.