आझादी कधीच मिळणार नाही, हे तरुणांना सांगण्याची गरज- लष्करप्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 08:38 AM2018-05-10T08:38:09+5:302018-05-10T08:38:09+5:30
दहशतवाद, काश्मिरी तरुण, फुटीरतावाद्यांवर लष्करप्रमुखांचं कठोर भाष्य
नवी दिल्ली: आझादी कधीच मिळणार नाही, हे सत्य काश्मिरी तरुणांना सांगण्याची गरज आहे, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलंय. दहशतवादाच्या मार्गाकडे वळणाऱ्या आणि दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या काश्मिरी तरुणांची संख्या चिंताजनक आहे. त्यावर लष्करप्रमुखांनी भाष्य केलं. हातात शस्त्र घेऊन काहीही साध्य होणार नाही. या मार्गानं कधीही आझादी मिळणार नाही, असं रावत यांनी म्हटलंय.
'हातात शस्त्र घेणाऱ्या आणि त्यासाठी त्यांची माथी भडकावणाऱ्यांना मला सांगावसं वाटतं की, या मार्गामुळे त्यांना कधीही आझादी मिळणार नाही. आझादी मिळणं अशक्य असल्यानं काश्मिरी तरुणांचे त्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ आहेत. तुम्ही कशासाठी हाती शस्त्रं घेत आहात? आझादी मागणाऱ्यांविरोधात आम्ही कायम लढत राहू. आझादी शक्य नाही. कधीही शक्य नाही,' असं बिपीन रावत यांनी इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. यावेळी त्यांनी लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवरदेखील भाष्य केलं. 'एन्काऊंटरमध्ये किती दहशतवादी मारले, याला मी फारसं महत्त्व देत नाही. हे चक्र असंच सुरू राहणार असल्यानं या गोष्टीला फार महत्त्व द्यावं, असं मला वाटत नाही. नव्या दहशतवाद्यांची भरती सुरुच राहिल. मात्र हे सर्व व्यर्थ आहे. यातून काहीच साध्य होणार नाही. तुम्ही लष्कराविरुद्ध लढू शकणार नाही,' असं लष्करप्रमुख म्हणाले.
दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांवर रावत यांनी कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं. 'आम्हाला त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना आनंद होत नाही. मात्र त्यांना आमच्याविरुद्ध लढायचेच असेल, तर आमचा नाईलाज आहे. आम्ही त्यांच्याशी समर्थपणे दोन हात करु,' असं लष्करप्रमुखांनी म्हटलं. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई करताना लष्कराचे जवान शक्य तितकी काळजी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'भारतीय लष्कराचे जवान निर्दयीपणे वागत नाहीत. सीरिया आणि पाकिस्तानमध्ये लष्कराकडून थेट रनगाडे आणि विमानांचा वापर करुन कारवाया केल्या जातात. त्या तुलनेत भारतीय जवान नागरिकांची काळजी घेऊन दहशतवाद्यांशी लढतात. नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी जवानांकडून घेतली जाते,' असंही बिपीन रावत यांनी म्हटलं. तरुणांचा राग मी समजू शकतो. मात्र लष्कराच्या जवानांवर दगडफेक हा मार्ग असू शकत नाही, असंही ते म्हणाले.