Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 06:36 PM2024-05-26T18:36:55+5:302024-05-26T18:40:35+5:30
Manoj Pande Extension : मनोज पांडे हे देशातील पहिले इंजिनियर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखांची कमान सोपवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. जनरल मनोज पांडे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. मात्र. आता त्यांचा कार्यकाळ संरक्षण मंत्रालयाने एक महिन्याने वाढवला आहे.
रविवारी (२६ मे) मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या सेवेत एक महिन्याची मुदतवाढ मंजूर केली आहे. मनोज पांडे हे ३१ मे २०२४ रोजी निवृत्त होणार होते, परंतु आता मनोज पांडे हे ३० जून २०२४ पर्यंत सेवा करतील, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, मनोज पांडे यांची ३० एप्रिल २०२२ रोजी नियुक्ती झाल्यापासून ते लष्करप्रमुख पदावर कार्यरत आहेत.
संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २६ मे २०२४ रोजी लष्करी नियम १९५४ च्या नियम १६ अ (४) अंतर्गत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्तीच्या वयापासून (३१ मे २०२४) म्हणजे ३० जून २०२४ पर्यंत एक महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.
मूळचे नागपूर येथील असलेले मनोज पांडे यांना भारतीय लष्कराचा प्रदीर्घ अनुभव आहे. जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीत इंजिनिअर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माऊंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती. मनोज पांडे हे देशातील पहिले इंजिनियर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखांची कमान सोपवण्यात आली आहे.
'एनडीए' ते लष्करप्रमुख
मनोज पांडे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर स्थित वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावी नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी डेहराडूनमधील मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२ मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. कॅम्बर्ली (ब्रिटन) स्टाफ कॉलेज, महूचे आर्मी वॉर कॉलेज, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी 'हायर कमांड कोर्स' केला आहे. आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये देखील सक्रियरीत्या सहभागी झाले होते.