लष्करप्रमुखपदी लेफ्ट. जनरल सुहागच
By admin | Published: June 11, 2014 11:26 PM2014-06-11T23:26:58+5:302014-06-11T23:26:58+5:30
लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची पुढले लष्करप्रमुख म्हणून नियुक्तीच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची पुढले लष्करप्रमुख म्हणून नियुक्तीच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, असे सांगून संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी दलबीरसिंग सुहाग यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
संसदेत आज लष्कर उपप्रमुख आणि पुढले लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांच्याविषयी माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने व्ही. के. सिंग यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली.
सैन्य दलाशी संबंधित मुद्दे राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. असे मुद्दे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चर्चेला यायला नकोत, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली राज्यसभेत म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना लोकसभेत काँग्रेसचे उपनेते अमरिंदरसिंग आणि राज्यसभेत काँग्रेसचे उपनेता आनंद शर्मा यांनी व्ही.के. सिंग यांनी आज लेफ्टनंट जनरल सुहाग यांच्याबाबत केलेला टिष्ट्वट आपत्तीजनक असल्याचे सांगून व्ही.के. सिंग यांना मंत्रिमंडळातून त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली.
सरकार व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याची दखल घेईल आणि त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून बडतर्फ करेल, असा विश्वास आपल्याला आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)