... म्हणून सर्जिकल स्ट्राईकसाठी लष्कराने निवडली 'अमावस्येची रात्र'

By admin | Published: February 9, 2017 09:55 AM2017-02-09T09:55:56+5:302017-02-09T10:12:35+5:30

किर्र काळोख पसरलेला, घनदाट जंगल, कानावर पडणारी रातकिडयांची किरकिर त्या जंगलामधून चोर पावलांनी वाट काढत लक्ष्यापर्यंत पोहोचलेले कमांडो.

... as the Army chose 'New moon night' for surgical strikes | ... म्हणून सर्जिकल स्ट्राईकसाठी लष्कराने निवडली 'अमावस्येची रात्र'

... म्हणून सर्जिकल स्ट्राईकसाठी लष्कराने निवडली 'अमावस्येची रात्र'

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 9 - किर्र काळोख पसरलेला, घनदाट जंगल, कानावर पडणारी रातकिडयांची किरकिर त्या जंगलामधून चोर पावलांनी वाट काढत लक्ष्यापर्यंत पोहोचलेले कमांडो. समोर शत्रू तळावर शांतता असते. मृत्यू साक्षात आपल्याजवळ पोहोचला आहे याची शत्रूला कल्पनाही नसते. योग्य संधी आणि इशारा मिळताच कमांडो कारवाई सुरु होते. गोळीबाराचा आवाज कानावर पडताच गाफील शत्रू स्टेनगन हाती घेण्यासाठी धाव घेतो. 
 
तितक्यात दुस-या बाजूने गोळीबार सुरु होतो. हातबॉम्ब, ग्रेनेडच्या स्फोटांनी तळावर आगीचे लोळ उठतात. नेमके काय चालले आहे, कुठून हल्ला होतोय याचा काहीही अंदाज लागत नसल्याने शत्रू पूर्णपणे भांबावून गेलेला असतो. युद्धावर बेतलेल्या चित्रपटांमध्ये आपण अशा प्रकारची कमांडो कारवाई पाहिली आहे. पण प्रत्यक्षात भारतीय सैन्याच्या पॅरा कमांडोंनी 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री अशाच प्रकारची कारवाई करत शत्रूला नेस्तनाबूत केले.  
 
पॅरा रेजिमेंट ही भारतीय लष्कराची एलिट कमांडो फोर्स आहे. 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे लाँच पॅडस नष्ट केल्यानंतर सरकारने या कारवाईची आखणी कशी झाली, त्यात कोण सहभागी होते. याबद्दल माहिती देणे टाळले होते. पण टाइम्स ऑफ इंडियाने मिळवलेल्या माहितीनुसार या कारवाईमध्ये 19 पॅरा कमांडो सहभागी झाले होते. 
 
एक कर्नल, पाच मेजर, दोन कॅप्टन, एक सुभेदार, दोन नायाब सुभेदार, तीन हवालदार, एक लान्स नायक आणि चार पॅरा कमांडो या सर्जिकल स्ट्राईक्सच्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. भारत सरकारने दिल्लीत 68 व्या प्रजासत्ताक दिनी या टीममधील सदस्यांचा विविध शौर्य पदकाने गौरव केला. 
 
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने लगेचच या मोहिमेची आखणी सुरु केली होती. मोहिम फत्ते करण्यासाठी दाट काळोख असलेली अमावस्येची रात्र निवडण्यात आली होती. अखेर 28 सप्टेंबरची ती रात्र आली. हल्ला करण्यापूर्वी दहशतवादी तळावरील सर्व बारीकसारीक हालचालींची पूर्ण माहिती जमवण्यात आली होती. मेजर रोहित सुरी यांनी आपल्या टीमला दहशतवाद्यांना लाँच पॅड जवळच्या मोकळया जागेत टार्गेट करण्याचे निर्देश दिले होते. 
 
मेजरी सुरी आणि त्यांच्या टीमने लाँच पॅडपासून 50 मीटर अंतरावर असताना दोन दहशतवाद्यांना लक्ष्य केले. मोकळया जागेत सापडलेल्या एका दहशतवाद्याला ठार केले. दोन दहशतवादी जंगलामध्ये पळत असल्याचे दिसताच त्यांनी मानवरहीत विमानाच्या मदतीने त्या दहशतवाद्यांचा माग काढला. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सुरी दहशतवाद्यांना भिडले आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 
 
असा हल्ला करण्यापूर्वी शत्रूच्या गोटातील सर्व माहिती मिळवण्यासाठी पॅरा कमांडोंचे आणखी एका विशेष पथक 48 तास आधीच नियंत्रण रेषा पार करुन दबा धरुन बसले होते. कुठे हल्ला करायचा, त्यासाठी कुठल्या जागा निवडायची याची तयारी आधीच त्या टीमने तिथे जाऊन केली होती. दहशवाद्यांचे शस्त्रास्त्रांचे भांडार नष्ट करताना दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 
 
या कारवाई दरम्यान कमांडोंनी तळावरील एकही दहशतवादी जिवंत राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. सर्जिकल स्ट्राईकची ही कारवाई सोपी नव्हती. दहशतवाद्यांकडूनही जोरदार गोळीबार झाला. पण आपल्या एकाही कमांडोची जिवीतहानी होऊ न देता सर्व दहशतवाद्यांना संपवून ही टीम पुन्हा सुखरुप आपल्या तळावर परतली. 
 

Web Title: ... as the Army chose 'New moon night' for surgical strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.