रहस्यमयी हिममानवाच्या पाऊलखुणा आढळल्याचा लष्कराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 03:36 AM2019-05-01T03:36:26+5:302019-05-01T03:36:56+5:30
गिर्यारोहकांची माहिती : पुरावे म्हणून छायाचित्रेही प्रसिद्ध केली
नवी दिल्ली : लोककथा आणि आख्यायिकांमध्ये वर्णन केलेल्या ‘यती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘यती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.
लष्कराने या ट्विटरमध्ये म्हटले, ‘भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहण पथकाला ९ एप्रिल, २०१९ रोजी मकालु बेसकॅम्पच्या परिसरात ‘यती’ या पौराणिक प्राण्याच्या पावलांचे ३२ इंच लांब आणि १५ इंच रुंद अशा आकाराचे रहस्यमय ठसे आढळले. यापूर्वीही ‘यती’ हा गूढ हिममानव फक्त मकालु-बारुन राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास आढळल्याचे उल्लेख आहेत. ‘यती’च्या पावलांचे ठसे प्रत्यक्षात पाहिलेल्यांनी दिलेली माहिती, छायाचित्रे व व्हिडीओ अशा प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे हा दावा करण्यात आला असल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले. या संदर्भात लष्कर आणखीही काही छायाचित्रे व व्हिडीओ प्रसिद्ध करेल, अशी अपेक्षा आहे.
सूत्रांनी असेही सांगितले की, खरे तर आम्हाला ही माहिती १० दिवसांपूर्वीच मिळाली होती, पण आम्ही त्याची लगेच वाच्यता केली नाही, पण आमच्याकडे छायाचित्रांच्या स्वरूपात असलेले पुरावे ‘यती’च्या यापूर्वीच्या कथांशी मिळतेजुळते असल्याचे दिसल्याने आता आम्ही ते प्रसिद्ध करण्याचे ठरविले. हे पुरावे तपासून खात्री करून घेण्यासाठी आम्ही संबंधित विषयाच्या तज्ज्ञांकडे सुपुर्द केले आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले. लष्कराने या पाऊलखुणा ज्या भागात दिसल्याचा दावा केला आहे, तो प्रदेश नेपाळ व चीन यांच्या सीमेनजीक आहे. मकालु-बारुन खोऱ्यात असलेला मकालु हा हिमालय पर्वतरांगांमधील एक उंच पर्वत आहे. तो प्रदेश अत्यंत दुर्गम व निर्जन आहे.
आख्यायिका आणि वास्तव
कपी कुळातील ‘यती’ या रहस्यमय प्राण्याच्या अनेक आख्यायिका नेपाळी लोककथांमध्ये सांगितल्या जातात. त्यानुसार, या ‘हिममानवा’चे वास्तव्य हिमालयात, मध्य आशियात व सैबेरियात आहे. त्याचे वर्णन रानटी, केसाळ प्राणी असे केलेले आढळते.
‘यती’चा अनेक शतके शोध
१९२०च्या दशकात हिमालयात गेलेल्या सर एडमंड हिलरी यांच्यासह इतरही गिर्यारोहकांनी यात रस घ्यायला सुरुवात केली. १९५०च्या दशकात एव्हरेस्ट शिखरावर जाण्याचा पर्यायी मार्ग शोधत असताना, बर्फामध्ये पावलांचे अजब ठसे पाहिल्याचा दावा एरिक शिप्टन या ब्रिटिश गिर्यारोहकाने केला व ‘यती’चा शोध घेण्यात अधिक स्वारस्य निर्माण झाले.
‘यती’ला पकडण्यासाठी १९५०च्या दशकात नेपाळ सरकारने शिकारीचा रीतसर परावानाही जारी केला होता.
२००८मध्ये पश्चिम नेपाळमधील एका पर्वतावरून परत येणाºया जपानी गिर्यारोहकांनीही ‘यती’च्या पावलांचे ठसे दिसल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडे उत्तम कॅमेरे व दुर्बिणी होत्या, पण त्यांना ‘यती’ कुठे दिसला नव्हता. ‘यती’च्या म्हणून गोळा केलेल्या केस, दात, कातडी व विष्ठेच्या अनेक नमुन्यांची वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय चमुने २०१७मध्ये ‘डीएनए’ चाचणी केली, पण ते कुत्र्याच्या दाताचा असल्याचे व इतर सर्व नमुने काळ्या व विटकरी अस्वलांचे असल्याचे निष्पन्न झाले.