‘सर्जिकल’चे ‘व्हिडीओ फुटेज’ जारी करण्यास लष्कराची संमती
By admin | Published: October 6, 2016 05:29 AM2016-10-06T05:29:52+5:302016-10-06T05:29:52+5:30
‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत सुरू असलेली उलटसुलट चर्चा थांबविण्यासाठी गेल्या आठवड्यातील या कारवाईचा व्हिडिओ लष्करातर्फे आज केंद्र सरकारकडे देण्यात आला.
शीलेश शर्मा / नवी दिल्ली
‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत सुरू असलेली उलटसुलट चर्चा थांबविण्यासाठी गेल्या आठवड्यातील या कारवाईचा व्हिडिओ लष्करातर्फे आज केंद्र सरकारकडे देण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासंदर्भात सहकाऱ्यांशी सविस्तर चर्चाही केली. सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हिडिओ फुटेज जारी करण्यास लष्कराची हरकत नसल्याने त्याबाबतचा निर्णय पंतप्रधानांनीच घ्यायचा आहे.
मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्जिकल स्ट्राइक्सनंतच्या परिस्थितीचा आढावा घेतानाच, सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काय स्थिती आहे आणि देशभर अॅलर्टमुळे सतर्कता आहे का, याची माहिती करून घेतली. सर्जिकल स्ट्राइक्सबाबत विरोधक शंका उपस्थित करीत असले तरी मंत्र्यांनी त्याबाबत तोंड उघडायचे कारण नाही, असे इशारावजा आवाहन त्यांनी केले. आरोप-प्रत्यारोप यांमुळे देशात ऐक्याचे वातावरण नसल्याचा संदेश बाहेरील राष्ट्रात जात असल्याचे त्यांनी बैटकीत सूचित केले.
उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने गेल्या आठवड्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांची तळे उद्ध्वस्त केली होती. तथापि, भारताने हल्ला केला नसल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. भारतातही सर्जिकलबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. अरविंद केजरीवाल व काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनीही सर्जिकलचे पुरावे मागितले. मात्र, हे लोक पुरावे मागून पाकिस्तानच्या दुष्प्रचाराची री ओढत असून, त्यामुळे अप्रत्यक्षपणे भारतीय लष्करावर संशय व्यक्त होत आहे, अशी टीका भाजपा नेत्यांनी सुरू केली. हे प्रकरण अधिक चिघळू नये, यासाठीच मोदी यांनी मंत्र्यांना गप्प बसण्यास सांगितले आहे.
नऊ पाकिस्तानी मच्छीमारांना अटक
भुज : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारताच्या हद्दीत आलेली एक बोट अडवून, त्यातील ९ पाकिस्तानी मच्छिमारांना बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. ही बोट भारताच्या सागरी हद्दीतील चौहान नाल्यापाशी फिरताना आढळताच, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाहिली.
त्यांनी त्या बोटीसह ९ मच्छिमारांना किनाऱ्यावर आणून, त्यांची चौकशी व तपासणी केली. मात्र त्यांच्याकडे आक्षेपार्ह काही आढळले नाही. ते मच्छिमार चुकून भारताच्या सागरी हद्दीत आले होते. त्यांच्याकडे मासेमारीसाठीचे जाळे आणि अन्य साहित्य होते, असे सांगण्यात आले.
हा लष्कराचा अवमान - नायडू
सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांवर हल्ला चढविताना केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी या मोहिमेवर उलटसुलट चर्चा करणे म्हणजे लष्कराने केलेल्या अभिमानास्पद कामगिरीचा अवमान आहे. अशी बेजबाबदार विधाने आणि मागण्यांवर प्रतिक्रिया देण्याचीही गरज नाही. सुदैवाने काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या विधानांपासून स्वत:ला दूर केले असून, आपनेही या मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्जिकल कारवाईबाबत कोणत्याही भारतीयाच्या मनात शंका आहे, असे मला वाटत नाही. आपल्या लष्कराने उर अभिमानाने भरून यावा, अशी कामगिरी केली आहे.
सरकारवर विश्वास ठेवा - रिजीजू
‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत सरकारवर विश्वास ठेवून हा मुद्दा लष्करावर सोडावा’, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुुरावे देण्याची मागणी जोर धरू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते.