सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध करण्यास लष्कराची संमती
By Admin | Published: October 5, 2016 09:55 AM2016-10-05T09:55:52+5:302016-10-05T10:13:41+5:30
भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईबद्दल काही राजकारण्यांनी शंका उपस्थित केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईबद्दल काही राजकारण्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने या हल्ल्याचे व्हिडीओ चित्रीकरण प्रसिद्ध करायला सरकारला हिरवा कंदिल दाखवला आहे.
या सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडीओ चित्रीकरण प्रसिद्ध करण्यासंबंधी अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयावर सोपवला आहे. भारताने हे पुरावे प्रसिद्ध करावेत जेणेकरुन सर्जिकल स्ट्राइक न झाल्याचा जे दावा करत आहेत त्यांना सणसणीत चपराक बसेल असे एका वरिष्ठ लष्करी अधिका-यांने सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने सांगितले.
पाकिस्तानी लष्कराकडून या सर्जिकल स्ट्राइकचा दावा फेटाळण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे चित्रीकरण समोर येणे महत्वाचे असल्याचे या अधिका-याचे म्हणणे आहे. भारतातील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे देण्याची मागणी केली होती. अनेक बाबींचा विचार करुन व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध करण्यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
व्हिडीओ फुटेज सार्वजनिक झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव आणखी वाढेल का ? हा सुद्ध महत्वाचा मुद्दा आहे. नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन केलेली कारवाई परिणामकारक ठरल्याचे पुरसे पुरावे असल्याचे लष्करी अधिका-यांनी सांगितले. व्हिडीओ फुटेजसह फोटोग्राफ्सही उपलब्ध आहेत. या संपूर्ण कारवाई दरम्यान मानवरहित विमानकडूनही लक्ष ठेवण्यात येत होते. दहशतवादी तळांचे मोठे नुकसान झाल्याचे सबळ पुरावे सरकारकडे आहेत असे वरिष्ठ सरकारी अधिका-याने सांगितले.