सर्जिकल स्ट्राईकचा भाग असलेला मेजर जनरल लैंगिक छळ प्रकरणी दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 11:04 AM2018-12-24T11:04:24+5:302018-12-24T11:34:52+5:30
भारतीय सैन्यदलातील एका मेजर जनरलला महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आर्मी जनरल कोर्ट मार्शलने याप्रकरणी मेजर जनरलला लष्करातून बडतर्फ करा अशी शिफारस केली आहे.
नवी दिल्ली - भारतीय सैन्यदलातील एका मेजर जनरलला महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आर्मी जनरल कोर्ट मार्शलने याप्रकरणी मेजर जनरलला लष्करातून बडतर्फ करा अशी शिफारस केली आहे. दोन वर्षापूर्वी म्हणजे 2016 मध्ये मेजर जनरल देशाच्या नैऋत्य भागात कार्यरत असताना ही लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. महिला अधिकाऱ्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 या मेजर जनरलने सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे त्याला पदोन्नती मिळाली होती. कॅप्टन पदावरील महिला अधिकाऱ्याने लैंगिक शोषणाबाबत केलेले सर्व आरोप मेजर जनरलनी फेटाळले आहेत. 2016मध्ये लष्करप्रमुखांची नियुक्ती झाली. यावरून निर्माण झालेल्या गटबाजीचा मी बळी आहे, असा दावा मेजर जनरलने केला आहे.
मेजर जनरलला प्रकरणी कलम 354अ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे. मेजर जनरल दोषी आढळल्यामुळे त्यांना लष्करातून बडतर्फ करण्याची शिफारस आर्मी जनरल कोर्ट मार्शलने केली आहे. या निकालाला आव्हान देण्यात येणार असल्याचे मेजर जनरलची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले. मेजर जनरलची बाजू समजून घेतली नाही. पुराव्याची चिकित्सा व्यवस्थितपणे झालेली नाही, निकाल घाईघाईने दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आता हा निकाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.