पूरग्रस्त हैदराबादेत लष्कर तैनात
By admin | Published: September 25, 2016 03:09 AM2016-09-25T03:09:09+5:302016-09-25T03:09:09+5:30
मुसळधार पावसामुळे हैदराबाद आणि शेजारील रंगारेड्डी जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून मदतीसाठी लष्कराच्या चार तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
हैदराबाद : मुसळधार पावसामुळे हैदराबाद आणि शेजारील रंगारेड्डी जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून मदतीसाठी लष्कराच्या चार तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागाचा तेलंगणाच्या अन्य भागासोबतचा संपर्क तुटला आहे.
हैदराबाद शहर जलमय झाले आहे. हैदराबादेतील बेगमपेट, निजामपेट आणि हकीमपेट या भागात तसेच रंगारेड्डीच्या अलवा भागात लष्कराकडून मदतकार्य सुरू
करण्यात आले आहे, अशी माहिती लष्कराच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. हैदराबाद महापालिकेत (जीएचएमसी) लष्कराने एक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तेथून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी पहाटेच मनपा आयुक्त जनार्दन रेड्डी यांची भेट घेतली व तुकड्यांच्या सज्जतेची माहिती त्यांना दिली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निर्देशांनतर ६0 सदस्यीय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) स्थापना करण्यात आली आहे.
हे दल राखीव म्हणून तयार ठेवण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पूरस्थितीमुळे साथीचे आजार पसरणार नाहीत, याची आतापासून काळजी घेण्याच्या
सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)
संपर्कच तुटल्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
हैदराबाद शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला असून, उरलेल्या शहरापासून त्याचा संपर्क तुटला आहे. या भागात महापालिका आणि काही स्वयंसेवी संस्था अन्न, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत.