मध्यप्रदेशात डॅमेज कंट्रोलसाठी संघ विस्तारकांची फौज; बंडखोरांंमुळे भाजपाचे वरिष्ठ नेते अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 06:03 AM2018-11-23T06:03:28+5:302018-11-23T06:03:57+5:30
बंडखोरीमुळे ग्रासलेल्या मध्यप्रदेश भाजपाला डॅमेज कंट्रोलसाठी आता संघ विस्तारकांची मदत घ्यावी लागत आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार १०० हून अधिक संघ विस्तारकांनी मध्यप्रदेशात तळ ठोकला आहे.
- गजानन चोपडे
जबलपूर : बंडखोरीमुळे ग्रासलेल्या मध्यप्रदेश भाजपाला डॅमेज कंट्रोलसाठी आता संघ विस्तारकांची मदत घ्यावी लागत आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार १०० हून अधिक संघ विस्तारकांनी मध्यप्रदेशात तळ ठोकला आहे. पूर्व योजना आणि पूर्ण योजना, या धर्तीवर काम करण्यासाठी प्रशिक्षित विस्तारकच यशस्वी होऊ शकतात, ही बाब भाजपने हेरली असून त्या दिशेने रणनीती आखली आहे.
बंडोबांना थारा द्यायचा नाही, अशी भूमिका घेत पक्षश्रेष्ठींनी भाजपाच्या ५३ स्थानिक नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पण मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजपा नेते या बंडखोरांच्या कारवायांमुळे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे बूथनिहाय योजना आखणे ङ्क्तव त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चार राज्यातील १०० हून अधिक संघ विस्तारक राज्यात दाखल झाले आहेत. या विस्तारकांचा क्लास घेण्यात आला. आगामी लोकसभा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेची निवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. नाराजांची मनधरणी, रोज बुथनिहाय बैठका, दिवसभरातील कामांचा आढावा, मतदान केंद्रांवर साहित्य पोहचले वा नाही याचा पाठपुरावा, मतदारयादीसाठी नेमलेल्या पानप्रमुखाशी समन्वय साधणे आदी कामे संघ विस्तारकांवर सोपविली आहेत.
शेतकऱ्यांसाठी घोषणा
शेतमालाच्या रास्त भावासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान जून २०१७ मध्ये मंदसौरमध्ये झालेल्या गोळीबारात सहा शेतकºयांना जीव गमवावा लागला होता. शेतकरी वर्गामधील नाराजी कमी व्हावी यासाठी भाजपाने जाहीरनाम्यातील ५८५ घोषणांपैकी १०२ घोषणा शेतकºयांच्या हिताच्या केल्या आहेत. हा मुद्दा राज्यातील १०० जागांवर प्रभाव टाकू शकतो, असे भाजपा नेत्यांना वाटते. याशिवाय अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये झालेल्या दुरुस्तीमुळे नाराज समाजाला आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.