सैन्याने दिल्लीकडे कूच केले नव्हते - व्ही.के.सिंह
By admin | Published: January 10, 2016 11:19 AM2016-01-10T11:19:05+5:302016-01-10T16:33:37+5:30
सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केले होते हा वरिष्ठ काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला आरोप केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी रविवारी फेटाळून लावला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - सैन्य दलाने २०१२ साली तत्कालीन केंद्र सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीच्या दिशेने कूच केले होते हा वरिष्ठ काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला आरोप केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी रविवारी फेटाळून लावला.
सध्या मनिष तिवारी रिकामे आहेत. त्यांच्याकडे काहीही काम नाही. या विषयावर माझे पुस्तक आहे. ते त्यांनी वाचावे. त्यातून त्यांच्या सर्व शंका दूर होतील असे व्ही.के.सिंह यांनी सांगितले. दिल्लीत शनिवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मनिष तिवारी यांनी या घटनेचा उल्लेख केला.
सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचे चार एप्रिल २०१२ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिध्द झालेले ते वृत्त खरे होते. त्यावेळी मी संरक्षण खात्याच्या स्थायी समितीवर होतो. सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केले हे दुर्देवी आहे पण हे वृत्त खरे आहे. यावरुन मला आता वाद करायचा नाही असेही ते म्हणाले.
विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह २०१२ मध्ये लष्करप्रमुख होते. त्यांचा जन्मतारखेच्या मुद्यावरुन केंद्र सरकारबरोबर त्यावेळी वाद सुरु होता. १६ जानेवारी २०१२ च्या रात्री शेजारच्या हरणायामधून सैन्याची एक तुकडी केंद्र सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीच्या दिशेने निघाली होती असे वृत्त चार एप्रिल २०१२ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिध्द झाले होते. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी आरोप फेटाळून लावताना हे वृत्त मूर्खपणा असल्याचे म्हटले होते.