मणिपूरमध्ये आर्मी झाली सक्रीय! फुटीरतावाद्यांचे १२ बंकर, मोर्टार, आईडी केले उध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:06 AM2023-06-26T10:06:13+5:302023-06-26T10:06:32+5:30
लष्कर कारवाईसाठी गेले असता त्या त्या गावातील गावकरी, महिला या उग्रवाद्यांना वाचवत आहेत. तरीही प्रसंगावधान राखून लष्कर कारवाई करत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर धुमसत आहे. दोन समाजामध्ये आरक्षणावरून झालेला वाद हिंसक झाला आहे. एकमेकांवर जिवघेणे हल्ले, गोळीबार, स्फोट घटविले जात आहेत. असे असताना आता भारतीय लष्कराने पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत फुटीरतावाद्यांचे १२ बंकर उध्वस्त करण्यात आले आहे.
लष्कर कारवाईसाठी गेले असता त्या त्या गावातील गावकरी, महिला या उग्रवाद्यांना वाचवत आहेत. तरीही प्रसंगावधान राखून लष्कर कारवाई करत आहे. राज्य पोलीस आणि केंद्रीय दलाने तामेंगलाँग, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, कांगपोकपी, चुराचंदपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवली. यावेळी १२ बंकर उध्वस्त करण्यात आले.
साहुमफाई गावातील एका भातशेतीत पोलिसांना तीन 51 मिमी मोर्टार शेल, तीन 84 मिमी मोर्टार आणि आयईडी सापडले. आईडी नष्ट करण्यात आले आहेत. कर्फ्यूचे उल्लंघन, घरांमध्ये चोरी, जाळपोळ अशा गुन्ह्यांत 135 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 1100 शस्त्रे, 13702 दारूगोळा आणि विविध प्रकारचे 250 बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
काय आहे वाद...
मणिपुरमध्ये आरक्षणावरून कोकी कुकी आणि मैतेई समाजामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. दोन समुदायांमध्ये 3 मे रोजी पहिला संघर्ष झाला, त्यानंतर राज्याच्या विविध भागात सातत्याने हिंसाचार होत आहे. जातीय हिंसाचारात आतापर्यंत सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53% लोक मेईतेई समुदायातील आहेत, जे इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर, आदिवासी-नागा आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ भागात राहतात. जवळपास दोन महिने मणिपूर धुमसत आहे.