लष्करप्रमुख बिपीन रावतांचा पाकिस्तानला कठोर इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 03:35 AM2018-01-16T03:35:09+5:302018-01-16T03:35:45+5:30
पाकिस्तानने भाग पाडले तर दहशतवादी गटांविरोधातील आक्रमक उपाययोजना वाढवायला लष्कर तयार आहे, अशा कठोर शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत
नवी दिल्ली : पाकिस्तानने भाग पाडले तर दहशतवादी गटांविरोधातील आक्रमक उपाययोजना वाढवायला लष्कर तयार आहे, अशा कठोर शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकला सोमवारी इशारा दिला. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतविरोधातील कारवाया यशस्वी होऊ दिल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.
सैन्य दिनानिमित्त जवानांना रावत म्हणाले की, चीनशी असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे वाद सुरूच असून चीनकडून होणारे उल्लंघन रोखण्याचा लष्कर प्रयत्न करीत आहे. नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांना भारतात शिरता यावे, यासाठी पाकचे लष्कर सतत मदत करीत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत या देशविरोधी तत्त्वांना यश मिळू देणार नाही. आम्हाला जर भाग पाडले तर आमची लष्करी कृती आणखी वाढवली जाईल आणि इतर कृतीही केली जाईल, असे रावत म्हणाले.
चीन व पाक संतप्त
पाकिस्तान अण्वस्त्रांचा बागुलबुवा करीत असल्याच्या लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या शनिवारच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानने राजनैतिक माध्यमांचा वापर केला. अशा वक्तव्यांमुळे भारत तणावाला भर टाकू पाहत आहे, असे पाकने म्हटले आहे. रावत म्हणाले होते की, पाकिस्तान अण्वस्त्रांचा बागुलबुवा करीत असून, त्याच्याशी युद्ध झाले तर पाकिस्तान पूर्णपणे उघडा पडेल. रावत यांनी डोकलाम वादासंदर्भात केलेल्या वक्तव्यांविषयी चीननेही नाराजी व्यक्त केली आहे. अशा वक्तव्यांमुळे सीमेवरील वादात भरच पडेल, अशी भीतीही चीनने व्यक्त केली आहे.
कोविंद, मोदींकडून शुभेच्छा!
सैन्य दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकारी आणि जवानांना शुभेच्छा दिल्या. कोविंद टिष्ट्वटरवर म्हणाले की, भारतीय सैन्य दलाचे शूर पुरुष आणि महिला, ज्येष्ठ आणि ज्यांनी लष्करी गणवेश घातला आहे त्यांचे कुटुंबीय अशा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही देशाचा अभिमान आहात. आमच्या स्वातंत्र्याचे तुम्ही पहारेकरी आहात. सीमेवर तुम्ही सतत जागरूक असता हे माहीत आहे म्हणून आम्ही शांतपणे झोपतो.मोदी टिष्ट्वटरवर म्हणाले की, देशाची सेवा करताना ज्यांनी प्राणाचे बलिदान केले त्यांचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे व देशाच्या लष्करावर त्यांचा अविचल विश्वास
आहे.