LoC वर घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 12:03 PM2020-06-01T12:03:05+5:302020-06-01T12:05:15+5:30
सीमेवर पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीने दहशतवादी सतत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. मात्र, या दहशतवाद्यांचा हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत असून भारतीय सुरक्षा दलाचे जवान त्यांचा खात्मा करत आहेत.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमधील भारत-पाकिस्तानच्या सीमेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी लष्काराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टरजवळ दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी भारतीय सुरक्षा दलाने या दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अद्याप जवानांची शोध मोहीम सुरू आहे.
विशेष म्हणजे, सीमेवर पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीने दहशतवादी सतत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. मात्र, या दहशतवाद्यांचा हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत असून भारतीय सुरक्षा दलाचे जवान त्यांचा खात्मा करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दहशतवाद्यांनी काश्मीरच्या खोऱ्यात अशांतता पसरविण्यासाठी प्रयत्न केला आहे. गेल्या आठवड्यात पुलवामा जिल्ह्यात आयईडीने भरलेली सॅन्ट्रो कार जवानांनी जप्त केली होती. या कारमध्ये सुमारे 40 किलो आयईडी होते. ही कार जप्त केल्यामुळे मोठा घातपात टळला.
अशा प्रकारे दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना हिज्बुलच्यावतीने आखण्यात आला होता, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. गेल्या वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा या हल्ल्याचा कट होता.
दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीर खोऱ्यात हिज्बुल कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा केला आहे. तेव्हापासून दहशतवादी घाबरले असून हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पण, दहशतवाद्यांचा हा प्रयत्न जवान हाणून पाडत आहेत.