कुरापती पाकिस्तानच्या गोळीबारात धुळ्याचे जवान योगेश भदाणे शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 06:31 PM2018-01-13T18:31:40+5:302018-01-13T18:48:00+5:30
पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात धुळ्याचे जवान शहीद झाले आहेत.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे शनिवारी (13 जानेवारी) कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तरदेखील दिले. मात्र गोळीबारादरम्यान धुळ्याचे जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानाचे नाव लान्स नायक योगेश मुरलीधर भदाणे असे आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भदाणे गंभीर स्वरुपात जखमी झाले होत आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
28 वर्षीय लान्स नायक योगेश भदाणे हे धुळे जिल्ह्यातील खलाणे गावातील रहिवासी होते.
#JammuAndKashmir: Lance Naik Yogesh Muralidhar Bhadane, who was injured in ceasefire violation in Rajouri's Sunderbani sector today and later succumbed to his injuries. pic.twitter.com/zuUIYl1h2X
— ANI (@ANI) January 13, 2018
वर्ष 2017 मध्ये मारले 138 पाकिस्तानी सैनिक
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत आणि जबाबी हल्ल्यांमध्ये सन २०१७ मध्ये पाकिस्तानचे १३८ सैनिक मारले गेले व १५५ जखमी झाले. गुप्तवार्ता संस्थांच्या सूत्रांनी ही माहिती देताना सांगितले की, याच काळात काश्मिरमध्ये २८ भारतीय जवानांना वीरमरण आले तर ७० जवान जखमी झाले. सूत्रांनुसार गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानकडून केले जाणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन व सीमेपलिकडून केला जाणारा गोळीबार याला लगेचच्या लगेच आणि जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे खंबीर धोरण अवलंबिले.
गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये भारतास सोसाव्या लागलेल्या मनुष्यहानीच्या आकड्यास लष्कराने दुजोरा दिला. परंतु पाकिस्तानचे नेमके किती सैनिक मारले गेले वा जखमी झाले याचा आकडा दिला नाही. मात्र पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या प्रत्येक उल्लंघनाचे चोख प्रत्युत्तर दिले गेले, यावर लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी भर दिला.
सीमेवरील हिंसक घडामोडींमध्ये मारल्या जाणा-या लष्करी जवानांच्या नेमक्या आकड्याची कबुली पाकिस्तान सहसा देत नाही. अनेक वेळा मृतांचा आकडा कबुल केला जातो, पण ते लष्करी जवान नव्हे तर नागरिक होते, असा दावा केला जातो. त्यामुळे अशा आकडेवारीसाठी गुप्तवार्ता सूत्रांवर अवलंबून राहावे लागते. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ष २०१७ मध्ये पाकिस्तानने काश्मिरमध्ये ८६० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याआधीच्या वर्षी २२० अशा घटना घडल्या होत्या, म्हणजेच सरत्या वर्षात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना खूपच वाढल्या.
गेल्या वर्षभरात चीनने केली ४१५ वेळा घुसखोरी
गेल्या वर्षी डोकलामवरून भारत व चीन यांच्यात ७३ दिवस झालेला तणाव सर्वांना माहीत आहे. पण २0१७ मध्ये चीनने तब्बल ४१५ वेळा भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. चीनच्या सैनिकांनी २0१६मध्ये २७१ वेळा नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न केले होते.
नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये २३ वेळा गंभीर वादाचे प्रसंग घडले. लडाख, केडेमचौक, चुमार, पेंगोंग, स्पांगूर गॅप, हिमाचल प्रदेशमधील कौरिक, उत्तराखंडमधील बाराहोती, अरूणाचल प्रदेशातील नमका चू, सुमदोरोंग चू, असफिला व दिबांग घाट आदी भागांत या घटना घडल्याचे सैन्य दलाचे म्हणणे आहे.