ट्रक ड्रायव्हरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा लष्कराने २४ तासांच्या आत केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 05:33 PM2019-10-29T17:33:19+5:302019-10-29T17:34:13+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना लक्ष्य करण्यात येत आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी अनंतनाग जिल्ह्यात एका ट्रक ड्रायव्हरची हत्या करणाऱ्या एका दहशतवाद्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी २४ तासांच्या आत कंठस्नान घातले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी नारायण दत्त नावाच्या ट्रकचालकाची हत्या केली होती. आतापर्यंत दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात सहा ट्रक ड्रायव्हरांची हत्या केली आहे. दरम्यान, काल हत्या झालेला ट्रक ड्रायव्हर नारायण दत्त याच्या घरी दु:खाचे वातावरण आहे. ''वडील हयात नाहीत, हे आम्हाला काल फोनवरून समजले. आम्ही चार भावंडे आहोत. तसेच आमची देखभाल करणारेही कुणी नाही,''असे नारायण दत्त यांच्या कन्येने सांगितले.
ट्रक ड्रायव्हरची हत्या झाल्यानंतर पोलिस आणि सीआरपीएफने अनंतनागमध्ये सर्वत्र शोधमोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान बिजबेहरा येथे लष्कराच्या कचाट्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये एक दहशतवादी ठार झाला. मात्र त्याच्यासोबत असलेले इतर दहशतवादी फरार झाले.
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटवण्याचे काम लष्कराकडून सुरू आहे. तसेच परिसरात सर्च ऑपरेशनही सुरू आहे.