आर्मी मॅन ते गोल्ड मॅन... सुभेदार नीरज चोप्राच्या विजयानंतर लष्करप्रमुखांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:22 PM2021-08-07T19:22:28+5:302021-08-07T20:11:43+5:30

भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे.

Army man to gold man ... Army chief mm naravane tweets after Subhedar Neeraj Chopra's victory | आर्मी मॅन ते गोल्ड मॅन... सुभेदार नीरज चोप्राच्या विजयानंतर लष्करप्रमुखांचं ट्विट

आर्मी मॅन ते गोल्ड मॅन... सुभेदार नीरज चोप्राच्या विजयानंतर लष्करप्रमुखांचं ट्विट

googlenewsNext
ठळक मुद्देनीरज चोप्रा हा भारतीय सैन्यदलातील आर्मी मॅन आहे. त्यामुळे, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनीही ट्वटि करुन नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे

नवी दिल्ली - भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. मात्र, नीरजने या दोन्ही खेळाडूंचं स्वप्न सत्यात उतरवलं. ( Men's javelin throw final) भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. २००८नंतर (अभिनव बिंद्रा, नेमबाज) ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला.

भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरजचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. नीरज चोप्रा हा भारतीय सैन्यदलातील आर्मी मॅन आहे. त्यामुळे, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनीही ट्वटि करुन नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. 

जनरल एम.एम. नरवणे आणि भारतीय सैन्य दलाच्या सर्व रँकने सुभेदार नीरज चोप्राला ऑलिम्पिक #Javelin मध्ये 87.58 मीटर थ्रोसह गोल्ड मेडल जिंकल्याबद्दल अभिनंदन केलंय. यासंदर्भात भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आलं आहे. तसेच, “जेव्हा इच्छा असते तेव्हा एक मार्ग असतो हे नीरज चोप्राने सिद्ध केले आहे. टोकियोमध्ये इतिहास रचलेल्या इतर अनेक ऑलिम्पियनप्रमाणे नीरजचाही सशस्त्र सेना दलासह राष्ट्राला अभिमान आहे, असे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने आज संस्मरणीय असा खेळ केला. युवा नीरजने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नीरजच्या संयमाचं, धैर्याचं आणि अतुलनीय प्रदर्शनाचं कौतुकच, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकिया ऑलिंपिकमध्ये देशाला पहिलं गोल्ड मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. क्रमवारीनुसार त्याला दुसऱ्या क्रमांकावरून स्पर्धेत सुरुवात करावी लागली. ( Neeraj starts with massive 87.03m in 1st attempt. ) रिपब्लिक ऑफ मोल्डोव्हाच्या अ‍ॅड्रीयन मार्डारे हा प्रथम भालाफेकीसाठी आला अन् त्यानं ८१.१६ मीटर लांब भालाफेक केली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं सत्रातील सर्वोत्तम कामगिरी करताना ८५.३० मीटर लांब भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं पहिल्या प्रयत्नात ८२.४० मीटर लांब भालाफेक केली. चेक रिपब्लिकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ८३.९८ मीटरचे अंतर गाठून पहिल्या फेरीअखेरीस टॉप फाईव्हमध्ये स्थान पक्के केले. नीरजनं अव्वल स्थान टिकवून ठेवले.

नीरजची दमदार कामगिरी

दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले. ( Neeraj Chopra second attempt: 87.58) त्याला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सहकारी अन् प्रशिक्षकांनी पदकाचा जल्लोष तेव्हाच सुरू केला. नीरजनं सेट केलेल्या लक्ष्याचा आसपासही प्रतिस्पर्धींना फिरकता आले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ज्युलियनला दुसऱ्या प्रयत्नात ७७.९० मीटर भाला फेकता आला. नीरजची भालाफेक पाहून प्रतिस्पर्धी दडपणात गेलेले दिसले. तिसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजला ७६.७९ मीटर लांब भाला फेकता आला. चेक प्रजासत्ताकच्या व्हितेझस्लॅव्ह व्हीसलीनं तिसऱ्या प्रयत्नांत ८५.४४ मीटर लांब भाला फेकून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानच्या नदीमनं ८४.६२ मीटर लांब भालाफेकून पदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. 
 

Web Title: Army man to gold man ... Army chief mm naravane tweets after Subhedar Neeraj Chopra's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.