आकाश क्षेपणास्त्र लवकरच लष्करात; १० हजार कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 04:07 AM2019-05-31T04:07:47+5:302019-05-31T04:08:20+5:30
डिफेन्स इन्स्टिट्यूट अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) पदवीप्रदान कार्यक्रमासाठी आले असताना, डॉ. रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुणे : यशस्वी चाचणी झालेल्या आकाश या क्षेपणास्रासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात त्याची निर्मिती होणारअसून, लवकरच लष्करासाठी ते उपलब्ध होईल, अशी माहिती संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव तसेच डीआरडीओचे प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी गुरुवारी दिली.
डिफेन्स इन्स्टिट्यूट अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) पदवीप्रदान कार्यक्रमासाठी आले असताना, डॉ. रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी. जी. रामानारायणन उपस्थित होते. अठरा हजार मीटरच्या अल्टीट्यूटवर पंचवीस किलोमीटरपर्यत मारक क्षमता असलेले आकाश हे क्षेपणास्त्र आहे. आकाशचे सिकर हे पूर्ण देशी बनावटीचे आहे.
डॉ. रेड्डी म्हणाले, ‘‘आपल्याकडे देशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा अभाव असून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी डीआरडीओ सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने आपण अनेक देशांसोबत सामंजस्य करार केले असून, संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि शस्र निर्मिती क्षेत्रातील खाजगी कंपन्यांबरोबर करार करत आहोत. देशातील १३० महाविद्यालयांसोबत डीआरडीओने करार केले असून, या करारानुसार महाविद्यालयांना मटेरियल सायन्समधील एक क्षेत्र ठरवून दिले आहे. त्यानुसार त्यांना संशोधन करायचे आहे. संरक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन विकसित करण्यासाठी अनेक आयआयटींसोबत करार केले आहेत. संरक्षण क्षेत्रात नवे स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात येत आहे.’’