लष्करी अधिकाऱ्याने २१ वर्षांपूर्वीचे छायाचित्र दिले भेट, मोदी भावुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 08:54 AM2022-10-25T08:54:51+5:302022-10-25T08:56:11+5:30
गुजरातच्या सैनिकी शाळेतील सोहळ्यात पंतप्रधानांनी दिला होता पुरस्कार
कारगिल : भारतीय लष्करातील जवानांसोबत कारगिल येथे सोमवारी दिवाळी साजरी करत असताना, एका प्रसंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. कारगिल येथे मेजर अमित या युवा अधिकाऱ्याने मोदी यांना २१ वर्षांपूर्वीचे एक छायाचित्र भेट दिले. हा अधिकारी विद्यार्थीदशेत सैनिकी शाळेत शिकत असताना त्याला व आणखी एका विद्यार्थ्याला मोदी यांनी पुरस्कार दिला होता.
मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या पुरस्कार सोहळ्याचे छायाचित्र पाहून मोदी जुन्या आठवणींमध्ये काही काळ रमले. गुजरातमधील बालाचडी येथील सैनिकी शाळेत मेजर अमित यांचे शालेय शिक्षण झाले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी त्या सैनिकी शाळेला भेट दिली होती. त्यावेळी अमित व आणखी एका मुलाला मोदींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. अमित यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याचे ठरविले. आता ते मेजर पदावर कार्यरत आहेत. (वृत्तसंस्था)
मोदी व जवानांनी परस्परांना दिली मिठाई
कारगिलमध्ये साजऱ्या केलेल्या दिवाळीत लष्करी जवान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्परांना मिठाई भरवली. मोदी यांनी कारगिलमधील जवानांपैकी काही जणांशी संवाद साधला. त्यांचे क्षेमकुशल विचारले. मोदी यांच्याशी झालेल्या संवादामुळे हे जवान भारावले होते.
जवानांसोबत नऊ वर्षे दिवाळी
२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून ते दरवर्षी भारतीय लष्करातील जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात. २०१४साली मोदी यांनी सियाचीनमध्ये लष्करी जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती.
१९६५ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मोदी यांनी दिवाळीत पंजाबमध्ये लष्करी जवानांच्या तीन स्मारकांना भेट देऊन वंदन केले होते.
२०१६ हिमाचल प्रदेशात इंडो साली पंतप्रधान मोदी यांनी तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) या दलाच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर २०१७ साली काश्मीरमधील गुरेझ भागात, २०१८ साली उत्तराखंडमधील हरसिल येथील लष्करी छावणीला मोदी यांनी दिवाळीत भेट दिली होती.
२०१९ साली नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील राजौरी, २०२० मध्ये लोंगेवाला, २०२१ ला नौशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. यंदाच्या वर्षी त्यांनी कारगिलला भेट दिली होती.