सैन्याला हवी सीमापार हल्ल्याची परवानगी
By admin | Published: September 20, 2016 05:47 AM2016-09-20T05:47:37+5:302016-09-20T05:47:37+5:30
उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे.
नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे. ७७८ कि.मी.च्या नियंत्रण रेषेजवळ शस्त्रास्त्रे तैनात करण्याची मागणी सैन्याकडून होऊ शकते. मर्यादित पण, दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला कडक इशारा देण्याचा यामागचा हेतू आहे.
काश्मिरातील घुसखोरीत झालेली वाढ पाहता सरकारला सीमेपलीकडे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा एक मतप्रवाह आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाला सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानच्या भूभागात हल्ला किंवा गुप्त सैन्य अभियान, अशी कारवाई तूर्तास तरी होऊ शकत नाही. कारण, नियंत्रण रेषा न ओलांडताही भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करू शकते.
सैन्य दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असेही मत आहे की, कडक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला हा संदेश द्यायला हवा की, झाले ते पुरे झाले. पठाणकोट, मुंबई हल्ल्यासारखे अतिरेकी हल्ले आम्ही किती दिवस सहन करणार आहोत. याचा बदला आम्ही घेणार नाही का? आमचा हा दृष्टिकोन पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे धैर्य वाढवत आहे. यावर उपाय म्हणून आमच्याकडे अनेक पर्याय आहेत.
नियंत्रणरेषेपलीकडील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचाही पर्याय आहे. ९० कि.मी. हल्ल्याची क्षमता असलेल्या रॉकेटपासून ते २९० कि.मी.ची क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचाही वापर करता येऊ शकतो. प्रखर हवाई हल्ल्यामध्ये मिराज २०००, जग्वार आणि सुखोई-३० यांचा वापर करता येऊ शकतो; पण ही कारवाई अतिशय काळजीपूर्वक करावी लागेल, असा एक मतप्रवाह आहे.
कारण, पाकिस्तानची सुरक्षाप्रणाली ही भारताच्या हवाई दलाचे नुकसान करू शकते, तर पाकिस्तानविरुद्धचा एक हल्लाही युद्धात रूपांतरित होऊ शकतो आणि पाकिस्तानने हे वारंवार सांगितलेले आहे की, ते भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करु शकतात.