सेना दले बोलत नाहीत, मोहीमच फत्ते करतात!
By Admin | Published: October 9, 2016 05:27 AM2016-10-09T05:27:24+5:302016-10-09T05:27:24+5:30
सीमापार सर्जिकल स्ट्राइक्सवरून राजकीय जुगलबंदी पेटली असतानाच भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी ‘सेना दले बोलत नाहीत, मोहीम फत्ते करतात,’ अशा शब्दांत
हिंडोन हवाई तळ : सीमापार सर्जिकल स्ट्राइक्सवरून राजकीय जुगलबंदी पेटली असतानाच भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी ‘सेना दले बोलत नाहीत, मोहीम फत्ते करतात,’ अशा शब्दांत शनिवारी पाकिस्तानला स्पष्ट इशारा
दिला. पाकिस्तानचे नाव ने घेता, कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास लष्कर सज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
भारतीय हवाई दलाच्या ८४व्या स्थापना दिनानिमित्त उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद जिल्ह्यातील हिंदोन हवाई तळावर आयोजित समारंभात राहा म्हणाले की, ‘या मुद्द्यावर देशात प्रचंड चर्चा झडत आहे. समाजाचा प्रत्येक घटक याबाबत आपले मत व्यक्त करीत आहे. मात्र, आम्ही याबाबत बोलणार नाही, केवळ करून दाखवू. देशाला हवी असलेली कामगिरी करून दाखविणे हेच सैन्याकडून अपेक्षित आहे, असे एअर चिफ मार्शल राहा यांनी सांगितले.
भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर रोजी केलेल्या सीमापार कारवाईवरून सध्या देशात राजकीय युद्ध पेटले आहे. सरकार या मोहिमेचा राजकीय लाभ उचलत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अरुप राहा यांनी वरील उत्तर दिले. या वेळी भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक ‘एअर शो’ने सर्वच उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाने यंदा पहिल्यांदाच एअर शोमध्ये भाग घेतला होता. या विमानांनी अप्रतिम कसरती केल्या. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. (वृत्तसंस्था)
कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी लष्कर तयार
- समारंभात बोलताना राहा म्हणाले की, जगात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. उरी आणि पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यांनी आपण किती अडचणींच्या काळात जगत आहोत हे दाखवून दिले.
कोणत्याही धोक्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही स्वत:ला घडविणे सुरूच ठेवणार असून, कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे राहा म्हणाले.
पाकिस्तानच्या वाढत्या धोक्याबाबत छेडले असता ते म्हणाले की, कोणत्याही उपखंडीय धोक्याला तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज आहे. राहा चिफ आॅफ स्टाफ कमिटीचेही अध्यक्ष आहेत.