लष्कर कुठल्याही मोहिमेसाठी सज्ज - लष्करप्रमुख सुहाग
By admin | Published: January 13, 2016 02:38 PM2016-01-13T14:38:00+5:302016-01-13T14:38:00+5:30
लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी लष्कर कुठलीही मोहिम पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे सूचक वक्तव्य केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - ज्यांनी भारताला वेदना दिल्या, त्यांनाही तशाच वेदना झाल्या पाहिजेत. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर सोमवारी म्हणाले होते. त्यांनी पाकिस्तानला नाव न घेता हा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी बुधवारी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मात्र लष्कर कुठलीही मोहिम पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे सूचक वक्तव्य केले.
पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सुहाग म्हणाले की, अतिरेक्यांविरुध्द कारवाई सुरु असताना समन्वयाचा मुद्दा नव्हता. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय होता असे त्यांनी सांगितले. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर घुसलेल्या सहा अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय सुरक्षापथकांना तीन दिवस लागल्याने सरकारवर टीका होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी समन्वयाच्या अभावाचा मुद्दा खोडून काढला. अतिरेकी ज्या इमारतीमध्ये होते त्या इमारतीमध्ये दोन सैनिक होते. सर्वप्रथम त्या सैनिकांना सुरक्षित बाहेर काढणे आवश्यक होते. ही कारवाई सोपी नव्हती. जिवीतहानी टाळण्यासाठी आम्ही वेळ घेतला असे सुहाग यांनी सांगितले.