भारताविरोधात मोठा कट; सीमेपलीकडून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:42 PM2020-07-11T13:42:17+5:302020-07-11T14:00:21+5:30
आज सकाळी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा आज सकाळी खात्मा करण्यात आला. यानंतर भारतीय लष्कराकडून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सीमेपलीकडे असलेल्या लॉन्चपॅड्सवरून २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
उत्तर काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये आज सकाळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे दोघेही नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. या भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर जवान अलर्ट झाले. त्यानंतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली.
Inputs indicate that their launchpads are fully occupied. If we've to guess, it could be anything between 250-300 terrorists presently occupying the launchpads opposite: Major General Virendra Vats, GOC 19 Infantry Division, Baramullah on present status of infiltration along LoC pic.twitter.com/hk8YXzZTTp
— ANI (@ANI) July 11, 2020
भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे मनसुबे उधळून लावल्यानंतर मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी पत्रकार परिषद घेतली. सीमेपलीकडे असलेल्या लॉन्चपॅड्सवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते घुसखोरीसाठी पूर्ण तयारीत आहेत. तशी माहिती आम्हाला मिळालेली आहे, असं वत्स यांनी सांगितलं. 'सीमेपलीकडे असणारे लॉन्चपॅड्स पूर्णपणे सज्ज आहेत. साधारणत: २५० ते ३०० दहशतवादी तिथे सक्रिय आहेत,' अशी माहिती बारामुल्लामधील जीओसी १९ इन्फंट्री डिव्हिजनच्या विरेंद्र वत्स यांनी दिली.
आज सकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईची माहितीदेखील लष्कराकडून देण्यात आली. 'नौगाम भागात नियंत्रण रेषेवर जवानांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पाकिस्तानी पोस्टच्या आसपास या हालचाली दिसल्या. त्यानंतर त्वरित कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला,' अशी माहिती वत्स यांनी दिली.
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे शस्त्रसाठा आणि रक्कम सापडल्याचं वत्स यांनी सांगितलं. दहशतवाद्यांकडे एके ऍसॉल्ट रायफल्स, १२ मॅगझिन्स, एक पिस्तुल आणि काही ग्रेनेड आढळून आले. याशिवाय त्यांच्याकडे भारतीय आणि पाकिस्तानी चलनातील दीड लाख रुपयांची रक्कम सापडली. या भागात अद्याप सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.